ध्येयपूर्तीच्या प्रवासाचा गोल
सोसायटी फुटबॉल आणि ते सुद्धा सोसायटीमध्ये राहणाऱ्या मुला-मुलींमध्ये खेळणे. ज्याप्रमाणे अभ्यासात सातत्याने प्रथम श्रेणीत राहून मनसोक्त मौजमजा करून सोसायटीतील आपल्या सवंगड्यांबरोबर वेगवेगळे खेळ खेळणे आणि त्यातच फुटबॉल या खेळाची आवड निर्माण होणे. मुख्य म्हणजे या फुटबॉल खेळाची आवड एवढी वाढली की या खेळात आपल्या जिल्ह्याकडून, राज्यात आणि देशाच्या महिला संघाकडून खेळून नाव कमाविण्याची कुणाची उत्कटता जागृत झाल्यास निश्चितच आश्चर्य वाटेल. पण, हे पुण्यातील एका मुलीच्या बाबतीत खरे ठरले आहे. समर्पित भावना आणि जबरद्स्त इच्छाशक्तीच्या जोरावर तिने आपले स्वप्न साकार केले. काजोल डिसूझा..! हे या मुलीचे नाव. आठ वर्षांपूर्वी आपल्या सोसायटीत फुटबॉल खेळायला काय लागली आणि तिला या खेळाची अशी काही गोडी लागली की तिने याच खेळात कारकिर्द घडविण्याचा विचार केला. तिचा हा प्रवास इतका चिकाटीचा होता की काजोलला आठ वर्षांत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली ती देखिल १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत.
खेळता… खेळता… आयुष्याचं ध्येय सापडतं आणि मग सुरू होतो ध्येयपूर्तीचा अखंड प्रवास. सोसायटी मित्र-मैत्रीणींबरोबर खेळत असलेल्या आणि आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आणि फुटबॉलच्या गोलसाठी वेडावलेल्या महिला फुटबॉलपटूचे नाव…
—काजोल डिसूझा-
काजोलचा मोठा भाऊ कियान आणि त्याच्या मित्रपरिवाराबरोबर काजोल नेहमी खेळायची. काजोलला मुलांप्रमाणेच काहीतरी धाडसी करण्याची इच्छा असायची. ती कायम स्वत:ची बरोबरी मुलांबरोबर करायची. त्यामुळे डिसुझा कुटुंबियांनी तिला नाराज केले नाही. घराजवळच असलेल्या उंड्री परिसरातील आर्सेनल सॉकर स्कूलमध्ये तिला घातले. तेथे प्रथम तिला रायन कोहेलो यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर बिशप स्कूल उंड्री प्रशालेत नाओमी वाझे यांनी तिच्यातील फुटबॉलपटूला पैलू पाडण्याचे काम केले. पुढे अनिल देशपांडे यांच्या सहकार्याने ती डेक्कन इलेव्हनकडून खेळली. कोरोनाच्या संकटकाळानंतर प्रशिक्षक योगेश यांनी तिला रॉयल एफसीमध्ये घेतले. काजोलला घरून कायम प्रोत्साहन मिळाले. तिला खेळण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल, याकडे अधिक लक्ष दिल्याचे तिची आई ग्रेटिया यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ती झटत होती. शालेयस्तरावर दोनवेळा काजोलने स्कूल गेम फेडरेशन आॅफ इंडियाच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. यामध्ये एकदा ती कांस्यपदकाची मानकरी ठरली. त्या स्पर्धेत तिने नऊ गोल केल्याने ती स्पर्धा कायम लक्षात राहिली, अशी आठवणही आई ग्रेटियांनी सांगितली.
जळगाव येथे २०२० मध्ये झालेल्या आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या बनलेल्या पुणे जिल्हा संघात तिचा सहभाग होता. काजोल संघात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. तिच्या निवडीमुळे पुण्याच्या फुटबॉलला सर्वोच्च स्तरावर ओळख मिळाली, असे जिल्हा फुटबॉल संघटनेचे (पीडीएफए) उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पीडीएफएचे मानद सचिव, प्रदीप परदेशी, जे निवड समितीचे सदस्य होते, पुढे म्हणाले, काजोल आणि तिच्या कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन. हा तिच्यासाठी खूप मोठा क्षण आहे आणि आम्ही तिच्या या उपलब्धीबद्दल आनंदी आहोत. वय लहान असल्यामुळे तिला मुंबईत महिला फुटबॉल साखळी स्पर्धेत खेळण्यास नकार देण्यात आला. तिला महाराष्ट्रात खेळण्यासाठी क्लब मिळू नये हे निराशाजनक होते, असेही तिच्या आईने सांगितले. त्यावेळी बेंगळुरूने काजोलसाठी दरवाजे उघडले. बेंगळुरुकडून महिला पात्रता फेरीत खेळण्यासाठी तिला परिक्रमा एफसीने संधी दिली. क्लबमधील चाचणी आणि त्यानंतर खेळण्यास मिळालेला होकार यामुळे काजोलच्या स्वप्नपूर्तिचा पहिला अध्याय सुरु झाला, असे म्हणायला हरकत नाही. परिक्रमा एफसीकडून तिची कामगिरी जबरदस्त राहिली. तीन वेळा ती सामन्याची मानकरी ठरली.
त्यामुळे फिफा १७ वर्षांखालील मुलींच्या विश्वचषकासाठी संघ निवड समितीच्या नजरा तिच्याकडे वळाल्या. तिला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. अमेरिका, मोरोक्को आणि ब्राझीलविरुद्ध झालेला खेळ तिला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मोठा होता. तिच्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी काजोलने भारतीय संघाबरोबर अनुक्रमे ६ व्या टोर्नियो महिला फुटबॉल स्पर्धा आणि १६ वर्षांखालील मुलींच्या खुल्या नॉर्डिक स्पर्धेसाठी इटली आणि नॉर्वेचा दौरा केला. नॉर्डिक स्पर्धेत, फॅरो बेटांविरुद्धच्या भारताच्या सामन्यात ती राखीव खेळाडू म्हणून खेळली. सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. मात्र, पेनल्टी शूट-आऊटवर भारताचा २-४ गोल फरकाने पराभव झाला.विशेष म्हणजे, या सगळ्यात काजोलचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले नाही. काजोलने तिच्या आयसीएससी दहावीच्या परिक्षेत ९२.२ टक्केही मिळविले. फुटबॉल खेळणे हे तिचे स्वप्न होते आणि ते ती जगली. घरून कुणीही फुटबॉल खेळत नव्हते. वडील आणि भाऊ यांनाही खेळाची फारशी आवड नव्हती. पण, आई धावपटू होती. तिच्या मेहनतीचे फळ मिळाले, असे तिची आई ग्रेटिया म्हणते. आता भारताचे वरिष्ठ स्तरावर प्रतिनिधित्व करण्याचे लक्ष्य तिने ठेवले आहे.(वरिष्ठ क्रीडा पत्रकार )
-शिवाजी गोरे (वरिष्ठ क्रीडा पत्रकार )