मुंबई | रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गासह पेण-खोपोली मार्ग व ग्रामीण भागात होणाऱ्या अपघातग्रस्तांना मागील अठरा वर्षांपासून पेण तालुक्यातील कल्पेश शरद ठाकूर हा तरुण रुग्णवाहिकेची विनामूल्य सेवा देत आहे. “अपघातग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने कल्पेश ठाकूर देवदूत ठरत असून त्याचं अनुकरण जिल्ह्यातील प्रत्येक युवकानं केलं पाहिजे”, असं आवाहन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस दलातर्फे अलिबाग येथे कल्पेशच्या सत्कार प्रसंगी केलं.
तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक व अन्य मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या रुग्णवाहिकेतून आत्तापर्यंत 1100 हुन अधिक अपघातग्रस्त रुग्णांना व कोरोना बाधित रुग्णांना पेण, अलिबाग, पनवेल, नवी मुंबई, मुंबई, कर्जत येथे कोणताही मोबदला न घेता रुग्णालयांत विनामूल्य सेवा देण्याचे कार्य कल्पेशनं केलं आहे.
आपला पेण येथील हॉटेल व्यवसाय सांभाळत असतानाच अपघातग्रस्तांच्या मदतीला कल्पेशनं नेहमीच धाव घेतली आहे. रुग्णवाहिकेसाठी लागणारे डीझेल असो किंवा चालकाचा मासिक पगार व गाडीचे छोटे-मोठे काम असो कल्पेश स्वतःच्या खर्चाने करत आहे. तसंच एखाद्या वेळी रुग्णवाहिकेवर चालक नसला तर स्वतः चालकाची भूमिका बजावत रुग्णाला सेवा देण्याचं कार्य देखील तो करत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणे पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ गावानजीक नुकत्याच 19 फेब्रुवारी 2023 रोजी इकोकार व ट्रकची जोरदार धडक होऊन अपघात झाला होता. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या 5 जणांना कल्पेशनं क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या रुग्णवाहिकेतून पेण व नवी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानं त्यांचे प्राण वाचले आहेत. ही अत्यंत तातडीची मदत करणाऱ्या ‘कल्पेश ठाकूर’च्या या कार्याची दखल घेऊन त्याचे रायगड पोलीस दलातर्फे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते अलिबाग येथे प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
“मुंबई-गोवा महामार्गावरील माझा हॉटेल व्यवसाय सांभाळत असताना, अनेक अपघात होताना पाहिले मात्र अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हे बघूनच मी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलो. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांची होणारी परवड बघून या रुग्णांसाठी स्वखर्चानं अत्याधुनिक रुग्णवाहिका घेतली आहे. अपघातग्रस्तांकडून कोणताही मोबदला न घेता तीन रुग्णवाहिकेतून ही मोफत सेवा मी अविरत सुरु ठेवली आहे. यापुढेही अपघातग्रस्तांना 24 तास मदत लागल्यास मोफत सेवा देत आहे व असेच मी सदैव देत राहणार आहे”, असं यावेळी कल्पेश ठाकूर, अपघातग्रस्तांचे मदतगार पेण यांनी यावेळी सांगितलं.