मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय अखेर निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. अशातच या प्रकरणावर कंगना रणौतचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहेत.
कंगना रणौतने एका युजरच्या ट्वीटला उत्तर देत केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. एका युजरने कंगनाचं दोन वर्षांपूर्वीचं ट्वीट शेअर करत ‘तिने आधीच याचा अंदाज वर्तवला होता. यामुळेच ती क्वीन आहे,’ असं म्हटलं होतं. त्या शेअर केलेल्या ट्वीटमध्ये ‘जो संतांची हत्या करतो आणि स्त्रियांचा अपमान करतो, त्याचा अंत होणं निश्चित आहे,’ असं कंगनाने दोन वर्षांपूर्वी म्हटलं होतं. त्या युजरचं ट्वीट रिट्वीट करत कंगना म्हणाली, ‘मी जे म्हटलं होतं, तो अंदाज नव्हता तर कॉमन सेन्स होता’ असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
कंगनाने दोन वर्षांपूर्वी केलेलं ट्वीट हे साधूंच्या हत्याकांडाबद्दल होतं. दरम्यान, कंगनाचं हे जुनं ट्वीट व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर कमेंट्स करत आहेत. कंगनाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.