सुंभ जळाला पण, पीळ नाही गेला! राष्ट्रवादीच्या ‘घड्याळीचे काटे’ कर्नाटक निवडणूकीत फिरणार..

Karnataka Assembly Election 2023 : मागील महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकांचं बिगूल वाजलं. त्यामुळं अनेक राजकीय पक्ष आपली बाजी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील महिन्यात दहा मे रोजी मतदान, तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष असले तरी, इतर अनेक प्रादेशिक पक्ष या निवडणूकीत भाग घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकात निवडणूक लढणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला कोणतं चिन्ह मिळणार याकडे लक्ष लागलं होतं. तत्पूर्वी राष्ट्रवादीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाला (Election Commission) पक्षाकडून विनंती करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कर्नाटक निवडणुकीसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर आज राष्ट्रवादीची (NCP) बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आज राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे. पक्षाकडून 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याची दाट शक्यता आहे.

Prakash Harale: