बंगळुरू : (Karnataka New CM Selection) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमताने एकूण १३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्यासाठी आज (रविवार) संध्याकाळी बेंगळुरू येथील हॉटेल शांग्रीला येथे नवनिर्वाचित काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या घराबाहेर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जमले आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले.
काँग्रेसने मुख्यमंत्री नेमण्यासाठी एक समिती तयार केली आहे. यामध्ये जेष्ठ काँग्रेसनेते सुशिल कुमार शिंदे यांचा सहभाग आहे. शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंग यांची काँग्रेसने निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निरीक्षक उपस्थित राहणार असून, ते पक्षाच्या हायकमांडला अहवाल सादर करतील.
काँग्रेस पक्षाने डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवल्यास भाजप केंद्रीय एजन्सीद्वारे शिवकुमार यांच्यावर ताबडतोब पकड करू शकते आणि या हालचालीमुळे काँग्रेसला पेच निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत काँग्रेस पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्यावर विश्वास दाखवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध १९ गुन्हेगारी खटले प्रलंबित असल्याचा खुलासा केला आहे. १९ प्रकरणांपैकी १० प्रकरणे त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने काढलेल्या निषेध मोर्चाशी संबंधित आहेत. चार प्रकरणे कथित आयकर चोरीशी संबंधित आहेत, तर दोन प्रकरणे मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवली आहेत.