- श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना चपराक
- चांडाळ चौकडी मधून फडणवीस यांना बाहेर पडण्याचा धडा
- कुलकर्णी, टिळक, बापटांनी ‘दाखवून’ दिले
- 28 वर्षाचा भाजपाचा बुरुज ढासळण्याचा कलंक फडणवीसांच्या माथी मारणारे बाजूला करा
सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीमुळे कसबा आणि पिंपरी चिंचवड या निवडणुकीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. या निवडणुकीमध्ये भाजपा – शिंदे (शिवसेना ) पक्षाच्या सरकारला फरक पडणार नसला तरी वैयक्तिक देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेला मात्र मोठा धक्का बसणार आहे. हा 100% उन्मदाचा परिपाक आहे , देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकतेचे दाखले देत या मतदारसंघात उंडारणाऱ्या ‘कसबा आमचाच’ ही आत्मप्रौढी मिरवणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या फाजील आत्मविश्वासाचा हा पराजय आहे .
टिळक – कुलकर्णी – बापट यांचा तिरस्कार करण्याचा आणि वेळ आली की त्यांना लोटांगण घालून, नाका – तोंडात नळ्या असतानाही असंवेदनशील वागणूक देणाऱ्या वृत्तीचा हा पराभव आहे. निवडणुकीचा उमेदवार ठरवताना देखील बापटांना विश्वासात न घेता – निवडून येण्याची मजबुरी म्हणून ‘बापटांचा कसबा’ हे मान्य करणाऱ्या पराभूत मानसिकतेचा हा पराभव आहे. फडणवीस यांचाकडून ग्राउंड रियालिटी नाकारण्याचा आणि सर्वांना ‘गृहीत धरण्याचा’ हा पराभव आहे.
रवींद्र धंगेकर याच्या पाठीमागे कधीच कुठल्याही मोठ्या पक्षाचे वलय नव्हते. हा विजय महाविकास आघाडीपेक्षा रवींद्र धगेकर यांचा वैयक्तिक विजय आहे, असे म्हणावे लागेल. प्रत्येकाशी डे टुडे आणि हाऊस टू हाऊस संपर्क ठेवला. रस्त्यावर फिरणाऱ्या – कुठेही बसणाऱ्या टपरीवर चहा पिणाऱ्या या कार्यकर्त्यांने हाय प्रोफाईल नेत्यांना दिलेली ही लढत बरेच काही शहाणपण शिकवून जाणारी आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत असले तरी तो धर्म आम्ही आमच्या देवघरातच पुजतो आणि रस्त्यावरचा धर्म मात्र लोकशाहीने जिवंत ठेवतो, ही दाखवणारे ही निवडणूक आहे. श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना थोबाडीत लावणारी ही निवडणूक आहे.
उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह डझनभर मंत्र्यांचे ताफे, पोलीस यंत्रणा, पैशाचा वारे माप वापर, त्याचे शक्ती प्रदर्शन या सर्वांवर देखील धंगेकर या सामान्य कार्यकर्त्याने दिलेली मात ही देवेंद्र फडणवीस यांना अनेक अर्थाने आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.
आपण ब्राह्मण समाजाचे आहोत म्हणून, मराठा बहुल असलेल्या राजकारणात बाजूला पडू नये यासाठी ब्राह्मणांना सातत्याने तिरस्करनिय वागणूक देणारे फडणवीस यांना देखील आज त्यांच्याच समाजाने दाखवलेली ही जागा आहे, हे नाकारून चालणार नाही.
तुमच्या दरबारात रोज हजेरी लावणारा, रोज मागेपुढे करणारा, प्रत्येक भेटीला गणपतीचा प्रसाद आणून श्रद्धेचे देखील भांडवल करणारा हेमंत रासने सारखा उमेदवार देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी चूक केली होती. रासने यांची उमेदवारी देताना तेथे धीरज घाटे पासून अनेक उमेदवारांना त्यांनी नाराज केले आणि अंतर्गत असंतोषाची ठिणगी पेटवली. हे जर असेच चालू राहिले तर फडणवीस यांचे साम्राज्य उध्वस्त करायला हा वणवा वेळ लावणार नाही .
त्यासाठी त्यांनी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, राजेश पांडे आणि तथाकथित माध्यम नियोजनकर्मी मयेकर या चांडाळ चौकडी पासून बाहेर येण्याची गरज आहे.
एकीकडे पक्षातीलच विरोधक वाढवून ठेवणाऱ्या फडणवीस यांना आज या निवडणुकीने मोठे शहाणपण शिकविले आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे अशा अनेकांची करिअर संपवून केवळ ‘आपल्या वर्तुळातील लोकांना प्रतिष्ठा’ आणि सत्तेचा सोपान देणाऱ्या फडणवीस यांना याचा विचार करायला पाहिजे .
आशिष शेलार, प्रसाद लाड आणि राजधानीतून खाली उतरल्यावर मोहोळ, हेमंत रासने, गोपीचंद पडळकर….. केवळ आणि केवळ आपल्या अवतीभवती घोटाळणाऱ्या, पक्ष निष्ठेपेक्षा व्यक्ति निष्ठाला महत्व देणाऱ्या या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सन्मान देत खिरापत वाटण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी चालवला आहे, तो पक्षाला अधोगतीला तर नेणार नाही ना ? त्याचा विचार आज त्यांनी करण्याची गरज आहे.
कसबा पेठ मध्ये आनंदाने बागडणारे गणेश बिडकर, राजेश पांडे, जगदीश मुळीक आणि मयेकर हे चांडाळ चौकडी हेमंत रासने यांच्या पराभवाला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे.
चंद्रकांत पाटील यांचा प्रभाव या पुण्यात कधीच नव्हता. कोल्हापूरचा उपरा उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दल असलेली नाराजी होतीच, केवळ भाजपाच्या आणि मोदींच्या प्रभावापुढे तुम्ही त्यांना निवडून आणले. ब्राह्मण शाही संपवली. हा एक राग लोकांच्या मनामध्ये होता, तो पुन्हा एकदा प्रकर्षाने जिवंत झाला.
मतदानानंतर एका महिलेची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होती, तिने सांगितले की, ‘आम्हाला येडा बागडा धंगेकरच बरा! अती शहाणे नकोत. आमच्या शनिवार वाडा – आमचा लाल महाल आम्हाला विकायचा नाही….. ‘एका सामान्य गृहिणीची ही प्रतिक्रिया म्हणजे मोदी – शहा – फडणवीस यांच्या कॉर्पोरेट आणि पूर्णतः व्यावसायिक चाललेल्या धोरणाच्या विरोधातील आणि त्यांनी पोसलेल्या हाय प्रोफाईल प्रभाग निहाय पुढाऱ्या – ज्येष्ठ कार्यकर्त्यांविरोधातील मोठी चपराक होती.
– अनिरुद्ध बडवे
anirudhabadave@gmail.com