पुणे: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा कात्रज- कोंढवा (Katraj-Kondhwa) रस्त्याचे काम आता ‘ वळणावळणा’ चे झाले आहे, अवघे सहा टक्के रुंदीकरण झाले असतानाही या कामावर आतापर्यंत तब्बल ६१ कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे महापालिका (PMC) प्रशासनाचा गलाथान कारभाराचा आणखी एक नमुना चव्हाट्यावर आला आहे, धक्कादायक बाब म्हणजे या कामाची ‘ गती’ अशीच कायम राहिल्त्यास हे काम पूर्ण होण्यास आणखी किमान सात ते आठ वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कात्रज- कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्यात आले. आतापर्यंत या कामावर जवळपास ६१ कोटींचा चुराडा झाला आहे. तर अर्धवट रस्त्याने कोंडी वाढत असून, शहरातील सर्वाधिक प्रदूषित असा या रस्त्याचा उल्लेख होत आहे. याच वेगाने हे काम झाल्यास हे काम पूर्ण होण्यासाठी पुणेकरांना आणखी ७ ते ८ वर्षांची प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज आहे. शहरातील वर्दळीचा आणि राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेल्या कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षांत अवघे ४० टक्के झाले आहे. अवघ्या चार किलोमीटर (Kilometer) रुंदीकरण असलेल्या या रस्त्यासाठीची जागा ताब्यात नसतानाच हे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे रुंदीकरणाचे दरवर्षी अवघे साडेसहा टक्के काम होत असल्याचे समोर आले आहे. ८४ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेस तब्बल ७५० कोटींच्या निधीची आवश्यकता होती. मात्र, हे भूसंपादन रखडत असल्याने आता भूसंपादनाचा खर्च (Expenses) आणखी १०० ते १२० कोटींनी वाढणार आहे. त्यातच हा रस्ता नेमका ५० मीटर करायचा, की ८४ मीटर? याबाबत महापालिकेचे धरसोड धोरण आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा खर्चही जवळपास ७० कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने या कामासाठी सुमारे १५० कोटींची निविदा काढली आहे. त्यातच आता महापालिकेने हा रस्ता ८४ मीटर (Meter) करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेस (PMC) या कामासाठी वाढीव निधी द्यावा लागणार आहे. त्यातच ताब्यात घेतलेल्या जागेवर वारंवार अतिक्रमणे होत असून ती काढण्यासाठी महापालिकेस मोठा आटापिटा करावा लागत आहे. भूसंपादन रखडल्याने खर्चही वाढण्याची शक्यता आहे.