…के हम कुछ नही कहते

मधुसूदन पतकी

हे जग माझ्या बोलण्यावर वाद, विवाद, वितंडवाद करते. गदारोळ होतो. वाटते जगबुडी होते की काय? अशा वेळी काय करावे? गप्प बसणे हेच योग्य ना! पण माझ्या गप्प बसण्यामुळे ही हलकल्लोळ उठतोय. गप्प बसणे इतके गोंधळ माजवणारे आहे का? आणि असे असेल तर गप्प बसण्याची सवय असलेली काय वाईट?

अदालत. सन १९५८. नर्गिस – प्रदीपकुमार. नर्गिस – राज हिट जोडीचा काळ. अशा वेळी अदालत प्रदर्शित. चित्रपटातली सगळी गाणी अत्यंत सुंदर. नर्गिसचा अभिनय. प्रदीपकुमारचा अभिनय हा बर्‍याच वेळा चेष्टेचा विषय. मात्र अनेक सुपरहिट चित्रपट आणि गाणी त्यांच्या नावावर. अदालतमधली गाणी अशीच एकसे एक सुंदर. लाजवाब! यूँ हसरतों के दाग मोहब्बत में धो लीए… खुद दिलसे दिल की बात कही और रो लिए… राजेंद्रकृष्ण यांचे शब्द. गाणे याला म्हणावे. लिहावे गाणे तर असे. एखादा क्षण असतो. काही तरी अलौकिक लिहिले जाण्याचा. राजेंद्रकृष्ण यांना अशाच एखाद्या, एका क्षणाला सुंदर स्वप्न पडले असावे. ते मोरपंखाच्या लेखणीने त्यांनी अक्षरबद्ध केलेले असावे. अदालतमधली गाणी अशीच स्वप्नांच्या गावातली. खरेतर ती अगदी आर्त. व्याकुळ करायला लावणारी. हृदयात कालवाकालव करणारी. नर्गिसचा अभिनय तसाच. ज्या गाण्यावर लिहिणार ते यूँ हसरतों के दाग नाही. त्यावर पुन्हा कधी तरी. मात्र आता जे गाणे घेतोय ते, उनको ये शिकायत है की कुछ नही कहते… अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते…

नितांतसुंदर शब्द. अथांग आशय. चिमटीत पकडायचा. तोही नाजुक बोटांनी. आशय बोटांच्या चिमटीत आणि आशयाचा रंग बोटांना लागतो. त्या बोटांना सोन्याची झळाळी येते. सृजनाचे आणखी एक बोट सूर, शब्द आणि रंगात न्हाणा.
बरेच काही सांगायचेय. मात्र सांगता येत नाही. बोलायचेय पण बोलता येत नाही. हे वारंवार न बोलणेच जगण्याचा एक भाग होतो. सवय होते. सवयीने जगणे की जगण्याची सवय? बोलणे ही नैसर्गिक भावना. पण आपल्या बोलण्याचा उपयोग होत नसेल, बोलून दिले जात नसेल तर… आणि विषय इथे नाही संपत. बोलणे थांबते वर तक्रार ही व्यक्ती बोलतच नाही… हे जखमेवर मीठ. बोलले तर काय हे होईल, हे तू बोलत नाहीस हे सांगणार्‍याला माहिती. अशा वेळी काय करावे. खरेतर मन सतत सांगते बोल. तू बोल. बोलले पाहिजेसच. पण परिस्थिती अशी आहे, की आम्ही काही बोलत नाही. बोलायचेच म्हटले तर सांगण्यासारखे खूप काही आहे. बरेच काही. सांगितले तर सहन होईल? एक बरे या जगाची कृपा आहे, की मी काहीच बोलत नाही. सांगत नाही.
यापुढे कधी काही बोललेच, सांगितलेच तर… तर हे जग माझ्या बोलण्यावर वाद, विवाद, वितंडवाद करते. गदारोळ होतो. वाटते जगबुडी होते की काय? अशा वेळी काय करावे? गप्प बसणे हेच योग्य ना! पण माझ्या गप्प बसण्यामुळेही हलकल्लोळ उठतोय. गप्प बसणे इतके गोंधळ माजवणारे आहे का? आणि असे असेल तर गप्प बसण्याची सवय असलेली काय वाईट? फक्त म्हणू नका मी गप्प का असते.

ठाव घेणारी शब्दरचना. अगदी साधी सोपी. लता आणि मदन मोहन ही सदाबहार जोडी. चित्रपटात प्राण पुन्हा जीव ओततो. या गाण्यात त्याचे सहज चमचेगिरी करणे लाजवाब. गाणे सहज आपल्या मनात उतरत जाते. गाण्यातली परिस्थिती अनेकदा आपल्या नशिबी आलेली असते. अनुभवलेली. आपल्या त्या भावनेला शब्दात बांधणा राजेंद्रकृष्ण म्हणून ग्रेट !

Sumitra nalawade: