सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा शिवसेनेला सवाल

मुंबई : (Keshav Upadhye On Uddhav Thackeray) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. उपाध्ये म्हणाले, “जनादेश खुंटीला टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात आला”, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याने महाराष्ट्राला संकटांच्या खाईत ढकलणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता सीमावादावर कंठ फुटला असला तरी सत्तेत असताना याच प्रश्नावर अंग झटकून वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी त्यांनी केली तेव्हा हे उसने अवसान कोठे गेले होते, असा सवालही उपाध्ये यांनी केला.

पुढे उपाध्ये म्हणाले, सीमाप्रश्न सोडवण्याची आमची तयारी आहे अशी पोकळ गर्जना उद्धव ठाकरे यांनी केल्याच्या आज प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या हास्यास्पद असून सत्तेत असताना ज्यांनी हा वाद केंद्रावर ढकलला ते आता फुशारक्यांपलीकडे काय करणार असा टोला त्यांनी लगावला आहे. “महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भागाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा जो निकाल येईल तो स्वीकारू, पण तोवर हा भाग केंद्रशासित करावा” अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. या माहितीकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले.

येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. अधिवेशन नागपुरात असताना मोर्चा मुंबईत काढण्याचे आघाडीचे नियोजन पाहता, मोर्चाची जबाबदारी ठाकरेंच्या उरल्यासुरल्या पक्षावर ढकलून बघ्याची भूमिका घेण्याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा डाव स्पष्ट दिसतो. आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते असलेले ठाकरे महामोर्चा काढायला निघाले हाच मोठा विनोद आहे, असेही ते म्हणाले. सत्तेवर असताना महाराष्ट्राचे हित साधणे जमले नाहीच, आता विरोधात बसून राज्याचे अहित तरी करू नका, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.

Prakash Harale: