मुंबई | Ketaki Chitale Explains On Talk About Joining Bigg Boss – छोट्या पडद्यावरील ‘बिग बाॅस मराठी’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. तसंच या कार्यक्रमाकडे वादग्रस्त कार्यक्रम म्हणून देखील पाहिलं जातं. ‘बिग बाॅस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत राहिला आहे. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात अभिनेत्री केतकी चितळे सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र नुकतंच तिने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर आता या पर्वात कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची चर्चा सुरु आहे. यात बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्यांमध्ये केतकी चितळेच्या नावाची चर्चा सुरु होती. या पर्वासाठी तिला विचारणा झाल्याचंही समोर आलं होतं. मात्र नुकतंच तिने आपल्याला कोणतीही विचारणा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ही अफवा असल्याचंही सांगितलं आहे.
या संदर्भात केतकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिने नुकतंच तिची ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्यात ती म्हणाली, “बरोबर एका वर्षापूर्वी मी एक पोस्ट करत माझे विचार स्पष्ट मांडले होते. मी ‘बिग बॉस सारख्या कार्यक्रमांना पाठिंबा देत नाही असं मी त्यात स्पष्ट लिहिलं होतं.”
“तसंच अशा नकारात्मकता पसरवणाऱ्या कार्यक्रमाचं मी समर्थन करत नाही. अशा माणसांवर प्रयोग करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणं म्हणजे मी माझा दर्जा कमी करुन घेणं आहे आणि अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मी माझी किंमत मुळीच कमी करुन घेणार नाही. मी पैशासाठी माझा दर्जा कमी करू शकत नाही”, असंही केतकीनं म्हटलं आहे.
“आपल्याकडे अशी सुविधा असती तर किती छान झालं असतं. ज्यांनी मला प्रत्येक वेळीला ‘बिग बॉस’ बद्दल विचारलंय त्यांनी एपिलेप्सीच्या संशोधनासाठी 1 रुपया दान करावा आणि वृत्त माध्यमांनी विशेषत: बिग बॉस संदर्भात माझं नाव छापल्यावर प्रत्येकवेळी एक हजार रुपये दान करावेत”, असंही ती म्हणाली.