मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मे महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर केतकी चितळेनं अटकेच्या काळात तिच्यावर झालेल्या कथित अत्याचारांबद्दल भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच जामीनावर बाहेर आलेल्या केतकीने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केवळ फेसबुकवर एक पोस्ट कॉपी-पेस्ट करुन स्वत:च्या प्रोफाइलवर अपलोड केल्याने मला तुरुंगामध्ये टाकण्यात आल्याचा दावा केतकीने केला आहे.
“पोस्ट केल्यानंतर काही वेळांनी पोलीस माझ्या दारात उभे होते. त्यांनी मला ताब्यात घेऊन अटक केली. या साऱ्या गोंधळामध्ये 20 ते 25 जणांनी माझी छेड काढली, माझ्यावर हल्ला केला, मला मारलं. शाईच्या नावाखाली माझ्यावर विषारी रंग फेकले, माझ्यावर अंडी फेकण्यात आली. केवळ माझ्यावरच नाही तर त्यांनी पोलिसांवरही हे हल्ले केले,” असं केतकीने म्हटलं आहे.
केतकीविरोधात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 22 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तिला 14 मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर 24 जून रोजी तिला जामीन मंजूर झाला. “मी सध्या एका पोस्टसाठी करण्यात आलेल्या २२ एफआयआरविरोधात न्यायलयीन लढा देतेय. या २२ पैकी केवळ एका प्रकरणात मला जामीन मिळालाय, अजून २१ प्रकरणं बाकी आहेत,” असं केतकीनं म्हटलं आहे.
सार्वजनिक दुष्प्रचार, बदनामी आणि विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे या प्रकरणांमध्ये केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र 29 वर्षीय केतकीनं हे एवढं सगळं सहन करावं लागण्याइतकं आपण काहीही केलेलं नसल्याचा दावा करते. “मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एखाद्या वेगळ्या अर्थाने घेतलं तर मी त्यात काहीही करु शकत नाही. मी केवळ काही यमक जुळवून केलेल्या (पोस्टसाठी) तुरुंगात होते. पवार म्हणजे धर्म नाहीत,” असं केतकीने म्हटलं आहे.