महाळुंगे ः खेड तालुक्यात नवीन प्रारूप आराखडा रचनेनुसार जिल्हा परिषदेचे नऊ गट आणि पंचायत समितीचे आठरा गण निश्चित झाले आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट आणि पंचायत समितीचे चार जण वाढले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांनी ‘पायात भिंगरी आणि गुडघ्याला बाशिंग बांधून’ आपल्याला सोयीचा व विजयाची खात्री असणार्या गटात व गणातील गावात सुख दुःखासह छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. निवडणुकीला उशीर असला तरी देखील तालुक्यात निवडणुक पूर्वीच इच्छुकांचे चेहेरे नागरिकांना कळू लागले आहेत.
यापूर्वी तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट आणि पंचायत समितीचे चौदा गण होते. परंतु नवीन प्रारूप आराखडा रचनेनुसार जिल्हा परिषदेचे दोन गट तर पंचायत समितीचे चार गण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची व पंचायत समितीची निवडणूक लढविणार्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. नवीन आराखड्यानुसार जुने गट व गणातील गावे फोडून नवीन गट व गणात समाविष्ट केले. जुने सात गट व गणांचे लचके तोडल्यासारखे करून गावांची अक्षरशः उलथापालथ केली.
इच्छुक कार्यकर्त्यांची लगबग
शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, तनुजा घनवट, बाबाजी काळे, निर्मला पानसरे, दिपाली काळे, रुपाली कड हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. आता यापैकी पुन्हा निवडणूक कोण लढविणार हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपा, सेना, काँग्रेस या पक्षांचे इच्छुक कार्यकर्ते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व बाजार समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात फिरताना दिसत आहेत.
त्यामुळे जुने गट व गण फोडून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य आमदारकीला प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकीय सोयीसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार्या प्रतिस्पर्धी सदस्यांची मूळ गावे आराखड्यात बदलून उलटीपालटी केली आहेत. गटात स्वतःचे गाव नसले तरी अनेक तगडे उमेदवार मात्र आव्हान पेलून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सन २०१७ च्या निवडणुकीत तालुक्यात सेना तीन, भाजपा व राष्ट्रवादी प्रत्येकी दोन असे सात सदस्य होते. तर पंचायत समितीत सेना आठ, राष्ट्रवादी चार आणि काँग्रेस व भाजपा प्रत्येकी एक असे चौदा सदस्यांचे बलाबल होते. तालुक्याचे लोकप्रतिनिधींना महत्त्वाची म्हणजे स्थानिक पंचायत समितीची सत्ता आपल्या ताब्यात असणे गरजेचे असल्याने कार्यकर्त्यांना सोयीची आणि प्रतिस्पर्धी पक्षाच्या कार्यकर्त्याला अडचणीची ठरेल अशा पद्धतीने गटातील गावांची अदलाबदली केल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील सांडभोरवाडी-काळूस, पाईट-पिंपरी, वाडा-कडूस, वाशेरे-नायफड, पिंपळगाव-दावडी आदी गटातील गावांचा समावेश नवीन गटात तर नवीन गावे जुन्या गटात समाविष्ट केल्याने गटातील गावांचे अक्षरशः लचकेतोड केल्यासारखे झाले आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे टेंशन वाढल्याने निवडणूक लढवावी की नाही अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे.