पंचकुला – Khelo India | महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अॅथलेटिक्समध्ये (Athletics) आठ सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक जिंकून खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये (Khelo India Youth Gems) निर्विवाद वर्चस्व गाजविले. सुदेष्णा शिवणकरने गुरुवारी (दि. ९) मुलींच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवून या स्पर्धेतील आपले तिसरे सुवर्ण (Gold Medol) जिंकले. या शर्यतीत अवंतिका नरळेला (२४.७५ सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या २०० मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या आर्यन कदमने २१.८२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या रिलेच्या संघाने ४ बाय ४०० मीटरमध्ये ४ मिनिट ०२.७६ सेकंदाची वेळ नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले.पदकतालिकेत महाराष्ट्र संघ ३१ सुवर्ण, २८ रौप्य, २३ कांस्य असे एकुण ८२ पदकांसह दुसर्या क्रमांकावर आहे.
ताऊ देवीला स्टेडियममध्ये आज महाराष्ट्र संघाच्या धावपटूंचा बोलबाला होता. मुला-मुलींच्या २०० मीटर, ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या शर्यतींमध्ये त्यांनी वर्चस्व गाजविले. मुलींच्या २०० मीटर शर्यतीच्या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांमधून साताराच्या सुदेष्णा शिवणकरला जोरदार प्रोत्साहन मिळत होते. सुदेष्णाने तिसरे सुवर्ण जिंकल्यावर तिच्या सहकार्यांनी व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सुदेष्णाचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक होते. सुदेष्णा शिवणकर आणि अवंतिका नरळे यांनी वैयक्तिक तीन-तीन पदके पटकावली.
सुदेष्णाने १०० मीटर धावण्यात नोंदवलेली (११.७९ सेकंद) वेळ तिचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. तिने २०० मीटरमध्ये २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवली. मुलींच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्येही सुदेष्णा शिवणकरसह (सातारा), साक्षी चव्हाण (औरंगाबाद), अवंतिका नरळे (पुणे), सिया सावंत (मुंबई) या खेळाडूंचा समावेश होता.
मुलींच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या मुलींनी त्यांच्या-त्यांच्या धावण्यात प्रत्येक चारशे मीटरला जिवाची बाजी लावून कामगिरी करीत सुवर्णपदक स्वत:चे व महाराष्ट्र संघाचे नाव कोरले. मुलींमध्ये हरियानाला चमक दाखवता आली नाही. तमिळनाडू आणि कर्नाटकच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.
दुखापतीतून पदकाकडे
मुलींच्या १०० मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसर्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडी तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.
मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. मुलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या आर्यन कदमने शर्यतीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेत २१.८२ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले.जलतरणमध्ये मुलींच्या गटात आन्या वालाने ४०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेतील तिसरे पदक आपल्या नावावर केले. आन्याने बुधवारी ८०० व २०० मीटर फ्रिस्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
मुला – मुलींच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक जिंकणारा आर्यन कदम (क्र. ३०२) आणि मुलींच्या गटात प्रथम क्रमांक जिंकणारी सुदेष्णा शिवणकर (क्र. २८३) अंतिम रेषा पार करताना. तिच्या शेजारी (क्र. २८९) अवंतिका नरळे.