मुंबई | Kirit Somaiya On Anil Parab And Uddhav Thackeray – माजी मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित दापोली येथील वादग्रस्त साई रिसाॅर्ट जमीनदोस्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मुरूडमधील वादग्रस्त रिसाॅर्ट तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजन करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. त्यावरुन आता पुन्हा भाजपचे नेते किरीट सोमेय्यांनी अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“अनिल परब यांचे ट्विन रिसाॅर्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे स्मारक पाडण्याच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दिवाळीत हे दोन्ही ट्विन टॉवर जमीनदोस्त झाले पाहिजेत. अनिल परब, उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे स्मारक दिवाळीपर्यंत जमीनदोस्त झाले असेल,” असा दावा किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात कागदपत्रेही प्रशासनाला पुरवली होती. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. त्यानुसार रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत.