मुंबई : (Kirit Somaiya On Kishori Pednekar) किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरील कथित घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात केलेला भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्तीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने करायला पाहिजे. मी तशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ते ही मागणी मान्य करतील, अशी आशा असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्या कंपनीने बनावट कागदपत्रे तयार केली होती. लोअर परळ येथील गोमाता जनता एसआरए गृहनिर्माण संस्था मर्यादित या एसआरए प्रकल्पात संजय अंधारी यांना गाळा मिळाला होता. गोमाता एसआरए प्रकल्पातील गाळा क्रमांक ४ संदर्भातील हे अॅग्रीमेंट आहे. या अॅग्रीमेंटवरील संजय अंधारीचा फोटो एसआरएकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातील संजय अंधारीशी मिळताजुळता नाही. या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मग खरा संजय महादेव अंधारी कोण हे शोधण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांची चौकशी केली पाहिजे.
किशोरी पेडणेकर यांनी कंपनी मंत्रालयाला दिलेल्या कागदपत्रांवरील संजय अंधारी यांचा फोटो हा दुसरा तिसरा कोणाचा नसून किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा म्हणजे सुनील कदम यांचा आहे. सुनील कदम यांचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यानंतर पेडणेकर यांनी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमधील गणेश कदम आणि कंपनी मंत्रालयाकडे सादर केलेल्या अॅग्रीमेंटवरील संजय अंधारी यांचा चेहरा सारखा आहे. किशोरी पेडणेकर यांनी आपल्या दिवंगत भावाचा फोटो वापरुन घोटाळा केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.