पुणे : (Kirti pathak On Smita and Jaydev Thackeray) एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी मंचावर उपस्थिती लावल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आत्तेबहीण कीर्ती फाटक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. स्मिता-जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सध्याचं सुरु असलेलं राजकारण दुर्वैवी आहे. आमच्या कुटुंबियांना हे राजकारण बघाताना त्रास होत आहे. ठाकरे कुटुंबीयच आम्हाला पाठिंबा देत आहेत, हे त्यांना दाखवायचं आहे, असा आरोप त्यांनी शिंदे गटावर केला आहे. तसेच, २००९ मध्ये बाळासाहेब हयात असतानाच स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये जायला निघाल्या होत्या. तशा उघड प्रतिक्रिया आणि मुलाखती त्यांनी माध्यमांना दिल्या होत्या. या सर्व गोष्टी शिंदे विसरले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
स्मिता ठाकरे यांचे ते विचार आता कुठे गेले, एकनाथ शिंदेंनी त्यांना याबद्दल विचारलं का? बाळासाहेब ठाकरे हयात असताना जी व्यक्ती काँग्रेसचे गोडवे गात होती, त्या व्यक्तीचा स्टेजवर सन्मान करताय, हा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता पाहतेय, असा टोलाही फाटक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.