मुंबई | Kishori Pednekar On Ashish Shelar – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप (BJP) विरूद्ध शिवसेना (Shivsena) राजकारण चालू असल्याचं दिसत आहे. दोन्ही पक्ष मुंबईत आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान, आज (28 सप्टेंबर) शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपच्या ‘मराठी दांडिया’वर टीकास्र सोडलं आहे. त्यालाच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटरवरून एक खुलं पत्र शेअर करत खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “मळमळीवर एकच सल्ला आहे, धौती योग घ्या ना”, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला दिला होता. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी तोंडसुख घेतलं.
“शब्दांचे फवारे उडवण्यात आशिष शेलार तरबेज आहेत. हिंदूंचे पारंपारिक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. विदर्भात गरबा होत नाही, भोंडला साजरा होतो. पण राजस्थान, गुजराती, मारवाडी गरबा करतात. त्यात सगळेच आनंद घेतात. सात्विक भाव कितीही असला, तरी आनंद घेणं महत्त्वाचं आहे. त्यात तुमचं राजकारण का वळवळतंय. मुद्दाम मळमळतंय, तळमळतंय असं म्हणत आहेत. धौती चूर्ण तुम्हीच घ्या”, असा खोचक टोला किशोरी पेडणेकरांनी आशिष शेलारांना लगावला आहे.
दरम्यान, पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्यावरही किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली. “मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही. कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे वडील, आजोबा, काका, भाऊ असं सगळं कुटुंबच राजकारणात मुरलेलं आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून (Gopinath Munde) राजकारणाचं बाळकडू घेतलं आहे”, असं पेडणेकर म्हणाल्या.