‘कोण होतीस तू, काय झालीस तू…’, गाणं ऐकल्यावर किशोरी पेडणेकरांना आठवल्या ‘या’ नेत्या

मुंबई | Kishori Pednekar In Bus Bai Bus Show – सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उत्तम कामगिरी केलेल्या स्त्रिया या कार्यक्रमात सहभागी होतात. तसंच अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. आता या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर हजेरी लावणार आहेत.

‘बस बाई बस’ या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना किशोरी पेडणेकर मजेशीर पद्धतीने आणि दिलखुलास उत्तरं देताना दिसल्या. तसंच या कार्यक्रमात प्रश्नांबरोबरच काही मजेशीर खेळ देखील खेळले जातात. यातील एक गमतीशीर खेळ म्हणजे गाण्याचे बोल ऐकून समोर कोणाचा चेहरा येतो ते मंचावरील स्त्रीला सांगायचे असते. किशोरी पेडणेकरांनाही काही गाणी ऐकवली गेली. यापैकी ‘कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू’ हे गाण्याचे बोल ऐकल्यानंतर कोण आठवलं, असं सुबोध भावेने त्यांना विचारलं. हे गाणं ऐकताच भाजपाच्या चित्रा वाघ यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याचं किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं.

पुढे किशोरी पेडणेकरांना ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणंही ऐकवण्यात आलं. हे गाणं ऐकताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ क्लिप्स झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत. किशोरी पेडणेकरांच्या या क्लिप्स सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे.

Sumitra nalawade: