मुंबई | Kishori Pednekar On Narayan Rane – शनिवारी (10 सप्टेंबर) रात्री शिंदे गट आणि शिवसैनिकांमधील वाद उफाळून आला. या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचं आहे, असा इशारा राणे यांनी ठाकरे गटाला दिला. यानंतर शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंची इमेज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“नारायण राणे इशारा देताय की धमक्या देताय. महाराष्ट्रातलं सरकार धमक्या देणारं सरकार आहे का?, असं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारावं असं वाटतंय. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असं नारायण राणे म्हणताय. नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती आहे आणि आता ते आम्हाला सांगणार?, नारायण राणेंची इमेज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे अशा फालतू धमक्या मुंबई आणि महाराष्ट्रात देऊ नका, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “मी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. पण त्यापूर्वी मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. आमच्यासारख्या महिलांना पण कोणत्याही प्रकरणात गोवतात. आमच्या लोकांनी काही केलं नसेल असं मी म्हणत नाही. पण केंद्रातले लोक इथं येऊन धमक्या देणार असतील तर आम्ही ऐकून घेणार नाही. आधी नाही ऐकलं. आता ऐकणार नाही”, असं देखील पेडणेकर म्हणाल्या.