मुंबई | Kishori Pednekar On Naveet Rana – काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. “तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे”, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. तसंच आता राणा दाम्पत्यानं अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राणा दाम्पत्याच्या आरोपांवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर गंभीर शब्दांत टीका केली आहे.
रवी राणा यांनी नुकतंच आरती सिंह यांच्यावर उद्धव ठाकरेंचं नाव घेत आरोप केला आहे. “आरती सिंह यांनी अडीच वर्षांत महिन्याला 7 कोटी रुपये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहचवले. याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांनी किशोरी पेडणेकरांना विचारलं असता त्यांनी नवनीत राणा यांचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “तिच्यावर मी बोलणार नाही. ज्या मुलीने 13व्या वर्षी घाणेरड्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली आहे, तिच्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही घरंदाज बायका तिच्यावर बोलणार नाहीत”, असं पेडणेकर म्हणाल्या.