कोल्हापूर : (Kolhapur Two MP v/s Shiv Sainik) कोल्हापूरच्या लाल मातीची कुस्ती अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली आहे. पण, राजकारणात रंगणाऱ्या निवडणुकांच्या कुस्त्याही काही नसतात. सध्या झालेल्या सत्तांतरानंतर कोल्हापूरात आगामी निवडणुका अतिशय ‘काटे की टक्कर’ होणार असून याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. कारण जिल्ह्यातील दोन खासदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यामुळं शिवसैनिकही चांगलेच आक्रमक झाले आहेत. म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण पूर्ण 360 अंशाने फिरल्यानं आगामी काळात आता नवीन समीकरण दिसणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरमधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी या दोन्ही खासदारांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. इतर ठिकाणी आमदार, खासदारांमागे जाणारे कार्यकर्ते राज्यानं पाहिले आहेत मात्र याउलट चित्र कोल्ह्यापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूरमध्ये आजपर्यंतचा वेगळा इतिहास पहायला मिळाला आहे. बंडखोर नेत्यामागे जिल्ह्यातीस शिवसैनिक कधीच गेला नाही. तो नेहमी शिवसेनेशी एकनिष्ठा राहिला आणि यावेळीही तेच घडलं. दोन खासदार बंडखोर झाले पण शिवसैनिकांनी मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.
सेनेच्या इतिहासात कोल्हापूरकरांनी शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं आहे. जो कोणी नेता पक्ष सोडून जाईल किंवा बंडखोरी करेल त्याला शिवसैनिकांनी पुढील निवडणुकीत पराभवची धुळ चारली. याच जर उदाहरण घ्यायचं झालं तर धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक ही नावं सर्वांना माहित आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या सेनेचे खासदार हे मतदारांमुळे आणि शिवसैनिकांनी निवडणुकीवेळी घेतलेल्या परिश्रमामुळे आहेत. या गोष्ट खासदारांनाही विसरता येणार नाही, असा सबुरीचा सल्लाही शिवसैनिकांनी दिला आहे. येत्या निवडणुकांमध्ये बंडखोर खासदार वि. शिवसैनिक अशीच लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील घराला तगडा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. मात्र शिवसेनेचे जिल्हा समन्वयक हर्षल सुर्वे यांनी इशारा दिला आहे. घरासमोर कितीही बंदोबस्त लावला, तरी शिवसैनिक याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे.