पोलिस आयुक्तांची मुदतपूर्व बदली राजकीय हेतूने


पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपूर्व बदली ही चुकीची व अन्यायकारक असून, ती केवळ आगामी महानगरपालिका निवडणुका विचारात घेऊन करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिपब्लिकन युर्वा मोर्चा, कष्टकरी पंचायत, भीमशाही युवा संघटनेच्यावतीने लेखी विनंती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे, अशी माहिती डंबाळे यांनी पिंपरी येथे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस कष्टकरी कामगार पंचायतीचे नेते बाबा कांबळे, भीमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे, तसेच रफिक कुरेशी, राहुल ओव्हाळ आदी उपस्थित होते.


यावेळी डंबाळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील संघटित गुन्हेगारी, तसेच अवैध धंदे आणि लँडमाफिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत आजपर्यंत त्यांनी दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांची समक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी सोडविण्याचा विक्रमही केलेला आहे. त्यामुळे ते पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे अत्यंत आदरणीय अधिकारी ठरले.

शहरातील कायद्या सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर जबर कारवाई करीत असतानाच सर्व सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थाच्या समाजाभिमुख कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावत त्यांनी सोशल पोलिसिंगचा सुयोग्य वापर करीत पोलिस व नागरिक यांच्यामधील कटूता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांसाठी त्यांचा खासगी मोबाईल नंबर २४ तास उपलब्ध करून दिला होता व त्याद्वारे समस्यांचे निराकरण करीत होते.

विशेषत: महिलावर्गामध्ये त्यांच्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. संघटित गुन्हेगारी संपविण्यासाठी आतापर्यंत त्यांच्या कालावधीत तब्बल ५० पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली असल्याचे यावेळी सांगितले

admin: