एकंदरीत जर पाहिलं तर सध्या सर्व पालकांना आपल्या मुला-मुलींनी हा खेळ खेळावा, तोच खेळ खेळावा असे वाटते, कारण त्याला ग्लॅमर आहे. पैसा मिळतो. पण दुसरेसुद्धा असे अनेक खेळ आहेत, ज्यामध्ये आपली मुले-मुली घडवू शकतात. खेळ फक्त ग्लॅमर आहे, म्हणून खेळू नये, ज्या खेळामुळे आपले मन प्रसन्न राहील. दिवसभर आपण ताजे-तवाने राहू, ज्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम होईल आणि मुख्य म्हणजे आपली आत्मविश्वास, एकाग्रता वाढली पाहिजे, असे खेळ खेळावेत. असे अनेक खेळ आहेत, त्यातलाच मल्लखांब एक… जो आपल्या संपूर्ण शरीराला, मनाला हवंय ते सर्व मल्लखांब खेळून किंवा त्याचा रोज सराव करून सर्व मिळते. मग केव्हा पाहायला जायचं हा खेळ आणि कधी सुरू करायचा मल्लखांबचा सराव.
या खेळामध्ये मुलांसाठी १२, १४, १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील (खुला गट), तर मुलींसाठी १२, १४, १६ वर्षांखालील व १६ वर्षांवरील (खुला गट) अशा वयोगटात, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होतात. गेल्या दोन वर्षांपर्यंत फक्त १८ वर्षांखालील व खुल्या गटातील मुलांसाठीच फक्त तीन साधनांवर स्पर्धा व्हायच्या, पुरलेला मल्लखांब, टांगता आणि दोरीचा इतर सर्व वयोगटात मुलांना फक्त पुरलेला व मुलींना दोरीचा मल्लखांब हीच साधने होती. परंतु दोन वर्षांपूर्वी मल्लखांब महासंघाने केलेल्या बदलानुसार १२, १४ मुले, १२, १४, १६, १६ वरील मुली या सहा गटांसाठी पुरलेला व दोरीचा मल्लखांब ही साधने अनिवार्य करण्यात आली.
कनिष्ठ व वरिष्ठ गटातील स्पर्धा ही एकूण ३० गुणांची असून इतर सर्व वयोगटातील मुला-मुलींना २० गुणांची स्पर्धा असते. १९ व्या शतकात पेशव्यांच्या काळात कुस्तीला पूरक म्हणून असा व्यायामप्रकार म्हणून सुरू झालेल्या मल्लखांबाला आदरणीय गुरुवर्य बाळंभट्ट दादा देवधर यांनी नवसंजीवनी दिली त्यानंतर कालांतराने कुस्तीच्या आखाड्यात मल्लखांब दिसू लागला, सन १९६२ मध्ये ग्वालेर -मध्य प्रदेश येथे मल्लखांबाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा, जिम्नॅस्टिकच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या बरोबर झाली, १९६८-६९ पासून अखिल भारतीय विद्यापीठस्तरावर मल्लखांबाच्या स्पर्धा होऊ लागल्या, त्यानंतर १९८० मध्ये मल्लखांब फेडरेशन आॅफ इंडियाची अधिकृत स्थापना होऊन मल्लखांबाच्या स्वतंत्र स्पर्धा होऊ लागल्या.
.महाराष्ट्रात राज्य शासनामार्फत श्री शिवछत्रपती पुरस्कारसुद्धा या खेळासाठी दिला जातो. संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा एक क्रीडाप्रकार म्हणजे मल्लखांब सुरुवातीच्या काळात इतर खेळांना पूरक म्हणून असलेला हा खेळ इतकी वर्षे अस्तित्वासाठी झगडत होता, तो आता मागील ५-६ वर्षांपासून नावारूपाला येतोय. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मल्लखांबासह इतर देशी खेळांना नवसंजीवनी मिळाली आहे हे नक्की.
खेलो इंडिया, फिट इंडिया मुव्हमेंट, यूथ गेम्स एक भारत श्रेष्ठ भारत अशा वेगवेगळ्या माध्यमातून मल्लखांबाला एक वेगळाच प्लॅटफॉर्म मिळत आहे, नुकताच तीन वर्षांपूर्वी मल्लखांबाचा पहिला वर्ल्डकपसुद्धा मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर येथे घेण्यात आला होता. सध्या संपूर्ण जगात जवळपास १८ ते २० देशांमध्ये मल्लखांब प्रशिक्षण देण्याचे काम जोमाने सुरू आहे. भारतात जवळपास २८ राज्यांत हा खेळ खेळला जातो, तसेच -खेलो इंडिया- या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य भारत सरकारने राष्ट्रीय संघटनेला दिले असून प्रचार व प्रसार करण्यासाठी सम्पूर्ण भारतभर जवळपास १० खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत, प्रत्येक संस्थेला २.५ ते ३ लाखांपर्यंतची साहित्यरुपी मदत करण्यात आली आहे व त्या माध्यमातून सम्पूर्ण भारतात मल्लखांब खेळ, खेळाडू, प्रशिक्षक यांना प्रोत्साहन देणे सुरू आहे.
मल्लखांब खेळाडूंना शासकीय सेवेत ५% आरक्षणसुद्धा असून अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. भारतीय क्रीडा खात्याने मागील सलग दोन वर्षे राष्ट्रीय पुरस्कारामध्ये द्रोणाचार्य व अर्जुन पुरस्कार देऊन मल्लखांबचा गौरव केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये गुजरात -वडोदरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मल्लखांब खेळाचा समावेश करून शासनाने, सर्व मल्लखांबपटूंना अजून एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, १९९४ ला मल्लखांब खेळाचा पुणे -म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश केला होता. आज हा खेळ सम्पूर्ण भारतभर, महाराष्ट्रात, विदेशात पोहोचवण्यासाठी सरकारची जी सकारात्मक पावले आहे, ते पाहून फारच आनंद वाटतोय. या सगळ्यांसाठी मी भारत सरकार व पंतप्रधान यांनी देशी खेळाचे पुन:रुत्थान करण्याचे जे प्रयत्न चालवले आहेत, त्याबद्दल मनापासून सलाम करतो.
मागील दोन वर्षांपासून आशिया खंडात हा खेळ वाढविण्यासाठी शिवछत्रपती पुरस्कारविजेते राजीव जालनापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आशिया संघटनेचीही स्थापना करण्यात आली असून ही संघटना खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न करीत आहेत आणि लवकरच पहिला आशिया चषक आयोजित होईल ही अपेक्षा. आजमितीला पुण्यात जवळपास ४० पेक्षाही जास्त संस्था, शाळा यामध्ये मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण दिले जाते, जवळपास जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची संख्या ही ४५० ते ५५० पर्यंत होत आहे आणि हेच या खेळाची प्रसिद्धी वाढण्याचे सुचिन्ह आहे.
पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या खेळाडूंचा इथे विशेष आणि आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, सम्पूर्ण महाराष्ट्रात मल्लखांबातील सर्वाधिक श्री शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू पुण्यातील आहेत. त्यातील १५ महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड, तर ६ अॅकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेचे आहेत. याव्यतिरिक्त पुण्यात आणि राज्यात अनेक ठिकाणी या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. तरी येणाऱ्या काळात मल्लखांब खेळाडूंना फार मोठे व्यासपीठ मिळणार आहे, हे नक्की. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपला हा अस्सल मराठी मातीतला खेळ महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व देशातील सर्व राज्यांतून खेळला जावा आणि त्यासाठी एकत्र आणि सांघिक प्रयत्न व्हावेत, हीच बजरंग बलीला मनापासून प्रार्थना, धन्यवाद….!!!
_अभिजित भोसले प्रशिक्षक -महाराष्ट्रीय मंडळ, कार्याध्यक्ष -पुणे जिल्हा मल्लखांब संघटना