लडकतवाडी : लोखंडी फाशात अडकून बिबट्याचा मृत्यू

यवत : दौंड तालुक्यातील लडकतवाडी येथे उसाच्या शेताच्या कडेला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या लोखंडी फाशात अडकून नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती यवतचे वनरक्षक सचिन पुरी यांनी दिली. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लडकतवाडी हद्दीत शेतकरी शशिकांत जनार्दन लडकत यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने लोखंडी फास लावला होता. या लोखंडी फाशात ५ ते ६ वर्षे वयाचा नर बिबट्या अडकला. त्याची यातून सुटका न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना पाच दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

घटनास्थळी पुणे विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, यवतचे वनरक्षक सचिन पुरी, नानासाहेब चव्हाण, सुनीता शिरसाट आदींनी भेट देत पाहणी केली. अज्ञात व्यक्तीने सुडभावनेने लोखंडी फासा लावल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nilam: