नवी दिल्ली | Lalit Modi – सध्या आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी ललित मोदींनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी धमकी दिली होती. तुमच्यासारख्या लोकांना लाखोवेळा खरेदी करून विकू शकतो, असं ललित मोदी म्हणाले होते. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आता ललित मोदींनी इन्स्टाग्रामार्फत मुकुल रोहतगींची माफी मागितली आहे.
ललित मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मी माझ्या इन्स्टाग्रामवरील पोस्टसंदर्भात पुन्हा एकदा विचार केला. रागाच्या भरात मी बोलून गेलो. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. मला माझ्या आईकडून आर्थिक संकटात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मी निराश झालो आहे. सॅमी आणि माझ्याकडे काही शेअर्स होते. आम्ही त्याच शेअर्सच्या माध्यमातून एका ट्रस्टमध्ये गुंतवणूक केली. आता हाच ट्रस्ट माझ्या आईनं बळकावला आहे. माझ्या आईच्या या वागण्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला खूप त्रास होतोय. तसंच त्याचा परिणाम माझ्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर झाला आहे. म्हणून मी हे सर्व सोडून सर्व अधिकार माझा मुलगा रुचीरकडे दिले आहेत,” असं मोदी म्हणाले.
पुढे ललित मोदींनी मुकूल रोहतगींना धमकी देण्यामागचं कारण सांगितलं. “मला तुमचा निषेध नोंदवायचा होता. कारण मला फरार म्हटलं जातंय. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात असताना देखील तुम्ही सहमती दर्शवली. मात्र मी न्यायाधीशांना खरेदी करणं आणि विकणं याबाबतचं भाष्य करायला नको होतं,” असंही ललित मोदी म्हणाले.
ललित मोदींनी मुकुल रोहतगींना नेमकी काय धमकी दिली होती?
“आदरणीय रोहतगीजी, तुमचा मी कधीच वापर केलेला नाही, किंवा माझ्याजवळ तुमचा नंबर नाही. नेहमीच मी तुमचा सन्मान केला आहे. पण, तुमच्याकडे फक्त तिरस्कार आहे. मला फरारी म्हणू नका. जर कोणत्या न्यायालयानं म्हटलं असतं, तर मी काही बोलणार नाही. पण, तुम्ही पुन्हा बोललात तर विनम्रपणे सांगणार नाही. जीवन खूप छोटं आहे. सगळीकडेच धोका आहे. जगातील कोणत्याही शहरात मोठी लोकं पायी चालत असतात. काही दिवसांपूर्वीच बसनं मला धडक दिली होती. पण, मी थोडक्यात बचावलो. माझं प्रतिनिधित्व तुम्ही करण्याची काहीही गरज नाही. त्यासाठी माझ्याकडे सर्वांत चांगले हरिश साळवे आहेत. देवाचा मी लाकडा मुलगा आहे. ते माझं संरक्षण करतात. न्यायाधीशांना रातोरात विकत घेऊन तुमच्या अशिलाला न्याय देत असाल. पण, मी तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो. तुमच्या अशिलासाठी तुम्ही कितीही लढू शकता, पण माझा उल्लेख ‘मिस्टर मोदी’च कराल. माझ्यासाठी तुम्ही मुंगीसारखे आहात. मात्र, तुमचं नशीब आहे की मला मुंग्या आवडतात. त्यामुळे तुम्हाला मी चिरडणार नाही. पण, तुम्ही प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये माझ्याबद्दल काही बोलल्याचं कळलं, तर मी तुमच्या मागोमाग न्यायालयात येणार. जय हिंद,” अशी धमकी ललित मोदींनी मुकुल रोहतगींना दिली होती.