रांजणी landslide | पुणे जिल्ह्यातील धोकादायक गावांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २३ गावांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती विविध सर्वेक्षणात पुढे आली आहे. त्याअनुषंगाने या गावांमध्ये संरक्षणात्मक, दरडप्रतिबंधक कामे करण्यासाठी सुमारे ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून ती कामे सुरूही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
३० जुलै २०१४ मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीणची दुर्घटना अद्यापही नागरिक विसरले नाहीत. येत्या ३० जुलैला माळीण दुर्घटनेला आठ वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. या दुर्घटनेत सुमारे १५१ जणांचा नाहक बळी गेला होता. माळीण गावाचे पुनर्वसन करून नव्याने पुन्हा गाव उभे करण्यात आले. अर्थात माळीणप्रमाणे धोकादायक असलेल्या जिल्ह्यातील गावांची पाहणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.
आंबेगावात प्रतिबंधात्मक कामांना वेग
आंबेगाव तालुक्यात माळीणप्रमाणेच पाच गावे धोकादायक असल्याचा निष्कर्ष पाहणी सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्याची चाहूल लागली असतानाच या धोकादायक गावांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित धोकादायक गावांमध्ये प्रतिबंधक कामांना वेगदेखील आला आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय, भारतीय वैज्ञानिक सर्वेक्षण सरकारी संस्थांमार्फत प्रत्येकी दोनदा, तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत एकदा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे स्वतंत्र अहवालदेखील सादर करण्यात आले आहेत.
संबंधित गावांमध्ये डोंगर उतारावर चर काढण्याचे काम सुरू आहे, तर धोकादायक असलेले डोंगरकडे तोडणे किंवा डोंगरकड्यात स्थिर करण्याची कामेदेखील सुरू आहेत. संरक्षक भिंत उभारणे गावांमध्ये पावसाचे पाणी येण्याची भीती असल्यामुळे ते पाणी बाहेर काढून घेण्यासाठी बांध घालून मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळल्याने गावावर कोणतीही आपत्ती कोसळू नये, यासाठी बांबूच्या झाडांची लागवड करणे त्यामुळे डोंगरावरून पावसामुळे वाहून येणारी माती बांबूच्या झाडांमध्ये अडकू शकते, अशा प्रकारची सुरक्षिततेची कामे सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एकूणच जिल्ह्यातील सुमारे २३ दरडी धोकादायक असल्याचा निष्कर्ष पाहणी अहवालातून स्पष्ट झाला असून त्याअनुषंगाने प्रशासनाने गावांच्या सुरक्षिततेसाठी होत असलेल्या कामांसाठी ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी दिला आहे आणि त्याअनुषंगाने माळीणच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून या धोकादायक गावांकरिता उपाययोजना
करण्याची प्रतिबंधात्मक कार्ये सुरू आहेत.