शेवटचे वळण…

निर्वाणीचा निरोप देतानादेखील उद्धव ठाकरे यांची अगतिकता ही सामान्य शिवसैनिकांना न पटणारी आहे; परंतु यात शिवसेनेच्या स्वाभिमानाचे घर आपल्या गर्वाने खाली करणार्‍या संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबाबद्दलचा आक्रोश मात्र प्रत्येकाच्या मनामनात आहे. उद्याच्या निवडणुकीत याचादेखील पक्षाला उपयोग होऊ शकतो. सत्तेच्या सारीपाटात एकनाथ शिंदे काकणभर सरस दिसत आहेत. उद्याची सत्तेची पहाट फडणवीस, शिंदे यांच्याकडे झुकणारी ठरेल.

महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होण्याच्या प्रवासातील आता शेवटचे वळण येत्या दोन दिवसांत घेतले जाईल. या प्रवासाला अमावास्येचा स्पीड ब्रेकर लागला नसता तर एव्हाना बुधवारची सकाळ नव्या सरकारच्या निश्चितीचे स्पष्ट संकेत देणारी ठरली असती. पुरोगामी महाराष्ट्रात अमावास्येची वेळ मानायची की नाही हा जरी आता अंतर्गत चर्चेचा विषय होत असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांपासून होणार्‍या मोहिमा या अमावास्या आणि पौर्णिमेचा अंदाज घेतच लढल्या गेल्या आणि ते यशस्वी ठरले हा इतिहास आहे. याला धार्मिक किंवा अंधश्रद्धेची किनार असली तरी त्याहीपेक्षा बहुतांशी सदस्यांचा या गोष्टींवर असणारा विश्वास आणि त्यांची मतं जपण्यासाठी घेण्यात येणारे निर्णय याची किनार आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्वाणीचा निरोप देत अक्षरशः गुडघ्यावर येत सर्वांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. संजय राऊत एकीकडे निर्वाणीचे इशारे देत असताना दुसरीकडे अगतिक होऊन उद्धव ठाकरे यांनी केलेले निर्वाणीचे आवाहन हा त्यांच्या अगतिकतेचा किंवा सरकार वाचविण्याच्या शेवटच्या प्रयत्नांचा मनापासून केलेला प्रयत्न दिसून येतो. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा शेवट जर आज होणार असेल तर आजच या दोन व्यक्तींच्या प्रवृत्ती या संपूर्ण गोंधळाला कशा कारणीभूत आहेत हे दिसून येते. आभाळ फाटत असतानाही आपली मस्ती, आपला गर्व, आपली मिजास तसूभरही कमी न करता संजय राऊत यांच्यासारखे वाचाळवीर आजही एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा उल्लेख रिक्षावाला म्हणून करीत हिणवत असतील आणि दुसरीकडे याच आमदारांना घेऊन आजही सत्तेचा सोपान कायम ठेवूयात अशी स्वप्ने उद्धव ठाकरे बघत असतील तर यात सरकारमधील एकाच पक्षातील दोन नेतृत्वांचा किती विरोधाभास आहे हे दिसून येते. दुर्दैवाने आदित्य ठाकरे यांनादेखील संजय राऊत यांचेच वारे लागल्यासारखे दिसते. विधानसभेत पाय ठेवू देणार नाही, अशा वल्गना करीत मुंबई आणि ठाण्याच्या उपनगरांत सध्या ते फिरत आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आपल्यासोबत हे लोक येणारच नाहीत असा विश्वास या शिवसेना नेत्यांना झालेला दिसतोय; परंतु निर्वाणीचे शब्द बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना केलेले अपील हे एका आईने लेकरांना घातलेली साद ठरावी असे आहे. बुद्धिबळाच्या पटावर आज एकनाथ शिंदे यांचा डाव अधिक सरस असल्याचे दिसत आहे. शिवाय राज्यपाल यापासून ते मतदार संघातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची मानसिकता या बंडाचा झेंडा कसा उभा राहील याकडेच असल्याचेदेखील स्पष्ट आहे. त्यामुळे संजय राऊत, शरद पवार यांच्या विचाराने चालणारी शिवसेना ही संकुचित झाली आणि निधीच्या कमतरतेमुळे बंडखोरांपासून ते भाजपलाच किंवा भाजप विचाराच्या सरकारला समर्थन द्यायचे या विचारापर्यंत जनतेची मानसिकता होताना दिसते.

सर्वांत मोठी भीती आमदारांना मतदारसंघाची असेल तर तीदेखील कशी मोडून काढता येईल याचीदेखील पद्धतशीरपणे विविध रचना होत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. निधी दिला नसल्यामुळे मतदारसंघाचा विकास कसा खुंटला याच्या पद्धतशीर क्लिपिंग या आमदारांच्या दूरध्वनीवरून किंवा कार्यकर्त्यांच्या व्हायरल कॉलमधून पेरल्या जात आहेत. ही सगळी फडणवीस चाल असल्याचेदेखील नाकारता येत नाही; परंतु भविष्यात शिवसेनेचे लेबल सोडून आपल्याला या मतदारसंघात उजळ माथ्याने पुढे जायचे आहे याचे भान ठेवून या आमदारांचे प्रमोशनदेखील केले जात असल्याचे दिसते. हिंदुत्वाची विचारधारा, त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा आणि राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार या घटकांमुळे मतदारसंघातला विकास खुंटला असल्याचे चित्र दाखवले जात आहे. एक निश्चित आहे, आता एकही बंडखोर आमदार शिवसेनेच्या गळाला लागणार नाही. भारतीय जनता पक्ष या प्रक्रियेमध्ये असो किंवा नसो, पण भाजपला अभिप्रेत असलेले सरकार या महाराष्ट्रामध्ये बनणार हे आता जवळजवळ सिद्ध झाले आहे. निर्वाणीचा निरोप देतानादेखील उद्धव ठाकरे यांची अगतिकता ही सामान्य शिवसैनिकांना न पटणारी आहे; परंतु यात शिवसेनेच्या स्वाभिमानाचे घर आपल्या गर्वाने खाली करणार्‍या संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबाबद्दलचा आक्रोश मात्र प्रत्येकाच्या मनामनात आहे. उद्याच्या निवडणुकीत याचादेखील पक्षाला उपयोग होऊ शकतो. सत्तेच्या सारीपाटात एकनाथ शिंदे काकणभर सरस दिसत आहेत. उद्याची सत्तेची पहाट फडणवीस, शिंदे यांच्याकडे झुकणारी ठरेल यात आता संशय राहिलेला नाही.

Dnyaneshwar: