देरसे मात्र दुरुस्त

राहुल गांधी किंवा प्रियांका यांची निवडणूककाळातही पदाधिकाऱ्यांना भेट मिळत नसेल तर पक्ष सर्वसामान्यांचा कसा होणार? असो, देरसे आये दुरुस्त आये. आता गांधी परिवार सर्वसामान्यांत मिसळेल. गहलोत अध्यक्ष झालेच तर वातावरण सुधारेल. पायलट यांना त्यांनी सांभाळून घेतले, मात्र मुख्यमंत्रिपद पायलट यांना देतील का? की राज्याचे राजकारण सोडणार नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा असेल.परिवर्तनासाठी बदल आवश्यक हे नक्की.

राष्ट्रीय म्हणता येईल असा काँग्रेस हा खरेतर एकमेव पक्ष आहे. आठ वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे राष्ट्रीयत्व अबाधित होते. आज देशभरात तो खंडप्राय असला तरी पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. पक्ष बहरण्याचे, मोहरण्याचे दिवस संपलेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती म्हणजे त्याच्या मुळाला खत-पाणी घातले जात नाही. त्याची निगा राखणारा माळी सध्या सापडत नाही.

गांधी घराणे पक्षाची निगा आणि वाढ करण्यास कितपत समर्थ आहेत, हा प्रश्नच आहे. तसेच गांधी घराणेच उत्तर आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. गांधी घराण्यातील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापाठोपाठ प्रियांका गांधी-वाड्रा यांचे नावही चर्चेत आहे. मात्र हवा बदलत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना अध्यक्ष करण्याचे मार्केटिंग सुरू आहे. गहलोत हे मुरब्बी राजकारणी आहेत. पक्षाच्या ध्येयधोरणांची त्यांना माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते गांधी परिवाराशी एकनिष्ठ आहेत. जी-२३ सदस्यांमध्ये नाहीत. साहजिकच गांधी परिवार गहलोत यांना मान्यता देईल, यात शंका नाही.

पण अखेरीस काँग्रेस आणि गांधीनिष्ठ यांनी गांधींशिवाय इतर कोणाला अध्यक्ष करायला तयार झाले, हेही नसे थोडके. गेल्या २४ वर्षांत गांधी घराण्याशिवाय कोणी काँग्रेसचे अध्यक्ष झाले नव्हते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी महाराष्ट्राचा संबंध शरद पवार यांच्यामुळे आला. शरद पवार या निवडणुकीत पराभूत झाले होते. पवार यांच्या आयुष्यात अत्यंत माेजके दोन पराभव आहेत, त्यातला तो एक आहे. मात्र गेल्या २४ वर्षांत निवडणुकीचेही वातावरण निर्माण झाले नव्हते. आता खरोखर काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण होईल. गांधी परिवार आणि विशेषतः राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

याचे कारण भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर नेहमी राहुल गांधी राहिले आहेत. त्यांना लक्ष्य केले, की काँग्रेसची सगळी ताकद त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी खर्च होते. काँग्रेसचा अध्यक्ष हे निवडणूक प्रचारातले टीका करण्याचे महत्त्वाचे कारण असते. त्यातून घराणेशाही आणि त्याअनुषंगाने केले जाणरे आरोप विचारात घेतले तर राहुल गांधी यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य म्हणावा लागेल. भारत जोडोसारखे अभियान ते सध्या राबवत आहेत. देशात भ्रमंती केल्यावर त्यांना त्या त्या प्रांताचे प्रश्न पण समजतील आणि भाजपवर प्रतिहल्ला करण्यास त्यांना रसद मिळेल.

खरे तर गांधी घराण्याला ज्या मंडळींनी वेढले आहे त्यांना या घराण्यापासून दूर केले पाहिजे. पूर्वी अहमद पटेल गांधी घराण्याच्या जवळ कोणी जायचे हे ठरवायचे. बहुतेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची तक्रार कोणीही गांधी कधीच भेटत नाहीत अशी होती. बुधवारी जयवीर शेरगिल यांनी काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला तर काही दिवसांपूर्वी आनंद शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला. या सगळ्यांची तक्रार एकच आहे, ती म्हणजे गांधी वेळ देत नाहीत. यात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजाचाही समावेश होतो. घराणेशाही असलेल्या पक्षांचे हेच दुखणे आहे.

शिवसेनेत उद्धव ठाकरे भेटत नाहीत. काँग्रेसमध्ये गांधी त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये मिसळणे हे इव्हेंट होतात. राहुल गांधी किंवा प्रियांका यांची निवडणूक काळातही पदाधिकाऱ्यांना भेट मिळत नसेल तर पक्ष सर्वसामान्यांचा कसा होणार? असो, देरसे आये दुरुस्त आये. आता गांधी परिवार सर्वसामान्यांत मिसळेल. गहलोत अध्यक्ष झालेच तर वातावरण सुधारेल. पायलट यांना त्यांनी सांभाळून घेतले, मात्र मुख्यमंत्रिपद पायलट यांना देतील का? की राज्याचे राजकारण सोडणार नाहीत हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असेल. पण परिवर्तनासाठी बदल आवश्यक हे नक्की.

Prakash Harale: