लातूरचा सागर बिराजदार गदेचा मानकरी; महाराष्ट्र कुस्ती महा-वीर २०२२ किताब

पुणे : मल्ल सागर बिराजदार व रामेश्वरचे मल्ल भरत कराड यांच्यामध्ये महाराष्ट्र कुस्ती महा-वीर-२०२२ स्पर्धेची अंतिम फेरी चांगलीच रंगली. रंजकदार झालेल्या या स्पर्धेत अखेर बाजी मारत निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगडचे सागर बिराजदार यांनी महाराष्ट्र कुस्ती महा-वीर-२०२२ या खुल्या गटातील किताब व चांदीची गदा पटकावली. सागरने अंतिम लढतीचा सामना १०-४ असा जिंकत जेतेपद पटकावले. तसेच त्याला ७१ हजार रुपये रोख, सुवर्णपदक, प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्मपूजक – दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा रामेश्वर (रुई), येथे झाली. १४ वर्षांपासून आयोजित या कुस्ती स्पर्धेत रामेश्वर येथील मल्ल भरत कराड यांनी उपविजेतेपद मिळविले. रौप्यपदक, प्रशस्तीपत्रक व रोख रुपये ५१,०००/- चे पारितोषिक देण्यात आले. सातारा येथील राहुल सुड याला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याला कांस्यपदक, प्रशस्तीपत्रक व रुपये ३१,०००/- रोख देण्यात आले.

सर्व विजेता खेळाडूंना विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, आमदार रमेशअप्पा कराड, रामेश्वर येथील माजी सरपंच तुळशीराम दा. कराड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी विक्रम शिंदे, अमोल पाटील, दत्ता पाटील उपस्थित होते.

निकाल:

  • ८६ किलो : प्रथम- श्रीकृष्ण जाधव, द्वितीय- कालिचरण सोलणकर, तृतीय- रविराज चव्हाण
  • ७४ किलो : प्रथम -नामदेव कोकाटे, द्वितीय -विष्णू तातपुरे, तृतीय -प्रकाश काळे.
  • ७० किलो : प्रथम -देवानंद पवार, द्वितीय- अभिजित भोसले, तृतीय- सुभिजित मदने
  • ६५ किलो : प्रथम – महेश तातपुरे, द्वितीय- सचिन बंडगर, तृतीय- विकास पिसाळ
  • ६१ किलो : प्रथम – तुषार माने, द्वितीय- दयानंद सलगर, तृतीय- विवेक शेंडगे
  • ५७ किलो : प्रथम – आकाश गडदे, द्वितीय- विशाल बरडे, तृतीय- मयूर फुलमाळी
Dnyaneshwar: