ब्राझील | Pele Passes Away – ब्राझीलचे महान फुटबाॅलपटू पेले (Pele) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिकट झाली होती. त्यानंतर अखेर आज त्यांचं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण फुटबाॅल जगतावर शोककळा पसरली आहे.
यासंदर्भातली माहिती पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Keli Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. जे काही आम्ही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peace असं कॅप्शन लिहित केलीनं सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
https://www.instagram.com/p/Cmw0NoRJEUm/?utm_source=ig_web_copy_link
नोव्हेंबरमध्ये पेले यांना साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलानं पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर केला होता. त्यानं हा फोटो शेअर करत ‘बाबा…. माझी ताकद तुमची आहे’, असं कॅप्शन दिलं होतं. तेव्हाच पेले यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता अखेर त्यांचं निधन झालं आहे.
पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानलं जात होतं. तसंच त्यांना फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. पेले यांना फिफानेही महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. त्यांच्या काळातील ते सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला आहे. पेले यांनी आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून जवळपास 1282 गोल मारले होते.