मुंबई : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य (health) विभागामार्फत नवनर्षात ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग व क्षयरोग ( tuberculosis ) शोध अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व निवडक शहरी भागातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण या कालावधीत करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. मागील काही वर्षापासून आरोग्य विभागाने कुष्ठरोग निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १.१६ इतके होते ते २०२४-२५ मध्ये म्हणजे सप्टेंबर २०२४ अखेरीस १.०७ इतके झाले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाची कुष्ठरोग शोध अभियानासाठीची राज्य माध्यम जनजागृती समितीची बैठक नुकतीच पार पडली. आरोग्य सेवा आयुक्त अमगोथु रंगा नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीला आरोग्यसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, राज्य क्षयरोग व कुष्ठरोग, डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, डॉ. रामजी अडकेकर, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग, डॉ. संजयकुमार जठार, सहाय्यक संचालक, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक, डॉ. नितीन भालेराव, सहाय्यक संचालक, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे संचालक डॉ. विवेक पै आदी बैठकीला उपस्थित होते.