(स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यास प्रारंभ केला. वर्षभरात काय करायचे याचे नियोजन, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, विरोधकांचे विच्छेदन, संघटनेचे वैचारिक सीमोल्लंघन आणि मतदारांना अभिवादन या सगळ्यांचा परिपाक त्यात असायचा. (स्व.) बाळासाहेब यांच्या वक्तृत्वाची मेजवानी या मेळाव्यात मिळायची. मात्र आज उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘एकला चलो रे’ अशी आहे. शिवसैनिक जपायचे आहेत आणि सहकारी पक्ष दुखवायचे नाहीत.
ज्या हिंदुत्वाबद्दल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आग्रही असतात, तो शब्द म्हणजे यशाचा मूलमंत्र समजतात त्या हिंदू सणात दसऱ्याला मोठे महत्त्व आहे. दसऱ्याला नव्या मोहिमांवर कूच केली जाते. राजे-रजवाड्यांच्या काळात दसऱ्याच्या मुहूर्तावर मोहिमांचा शुभारंभ केला जायचा, कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजय मिळवून देणारा मुहूर्त आहे, अशी तमाम हिंदूजनांची समजूत आहे. (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यास प्रारंभ केला. वर्षभरात काय करायचे याचे नियोजन, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, विरोधकांचे विच्छेदन, संघटनेचे वैचारिक सीमोल्लंघन आणि मतदारांना अभिवादन या सगळ्याचा परिपाक त्यात असायचा. (स्व.) बाळासाहेब यांच्या वक्तृत्वाची मेजवानी या मेळाव्यात मिळायची. शिवसैनिक चार्ज व्हायचे, तर विरोधक डिस्चार्ज व्हायचे.
खरा शिवसैनिक भक्तिभावाने आणि शिवसैनिक असण्याची पात्रता म्हणून दसरा मेळाव्याला जायचा. अभिमान छातीत भरून घ्यायचा, भारावून यायचा. मात्र गेल्या काही वर्षांत केवळ परंपरा चालवायची, म्हणून हा मेळावा घेतला जातो, असे दिसत आहे. शिवसेनेचा विचार नक्की कोणता, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे स्थान काय ? ते टिकवणार कसे ? नक्की विचारधारा कशी असेल ? या व यासारख्या प्रश्नांची उत्तरे दसरा मेळाव्यात मिळावीत, अशी अपेक्षा आहे. आता मेळावा कुठे होणार, यावरून अद्याप अनिश्चितता आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच पाहता या दोघांमध्ये असणारा संघर्ष केवळ तीव्रतम होणार आणि त्यासाठी सीमोल्लंघन करणे ही आवश्यक नाही. शिवसेनेचे स्वप्न देशभरात पसरण्याचे होते, मात्र त्यांचा राज्यातल्या राज्यात राजकीय सीमांचा संकोच होणार आहे, अशी वस्तूस्थिती आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे बुधवारी शिवसेनेच्या गटनेत्यांपुढे उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण महत्त्वाचे होते. दसरा मेळाव्याचा हा पूर्वरंग होता. मात्र हा पूर्वरंग फारसा रंगला नाही. नेहमीप्रमाणे तेच ते शब्द आणि वाक्प्रचार सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यात जीव भरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो शिवसैनिक वगळता फारसा कोणाला रुचला नसावा. नसेल.
एक तर मुद्दा शिवसेनेच्या गटप्रमुखांसामोर भाषणाचा होता.त्यांना गेल्या तीन महिन्यांच्या पार्श्वभूमीवर मानसिक बळ देणे हा महत्त्वाचा मुद्दा होता. फडणवीस यांची अखेरची तर आपली पहिली निवडणूक असल्यासारखे लढा हे वाक्य त्यातले पताकास्थान होते. या वाक्यातून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेपुढचे वास्तव फारसे आशादायक नाही, हे कुठेतरी कबूल केले. पुन्हा एकदा शिवसेनेत प्राण फुंकावे लागतील, याचा अंदाज कार्यकर्त्यांना दिला. लढाई मोठी आहे. वेळ खाणारी आहे. ती आदित्य ठाकरे यांना पुढे न्यायची आहे, हे पण सुचवले. चमकदार वाक्ये बोलणे सोपे असते, मात्र त्याप्रमाणे वागणे किंवा दुसऱ्यांना कृती करायला लावणे खूप अवघड असते. शिवसेना सन ९० च्या दशकात राज्यभर वाढली. त्यावेळी (स्व.)बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य पिंजून काढले होते. संपर्क वाढवला होता. सगळ्यात मोठे पथ्य त्यांनी पाळले. ते सत्ता हातात आली तरी सत्तास्थानावर कधी बसण्याची हौस भागवून घेतली नाही. उद्धव ठाकरे यांना शिवसेना पुढे न्यायची असेल आणि गतवैभव आणायचे असेल तर (स्व.) बाळासाहेबांना अनुसरले पाहिजे. त्यांच्या प्यारा दुश्मन असणाऱ्या इतर पक्षातल्या कोणालाही नाही.