पुणे स्थानक देशातील महत्त्वाचे स्थानक. मात्र साधी एखादी लिफ्ट देखील नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या संदर्भात रेल्वे विभागाशी पत्र व्यवहार केला असता चार लिफ्ट मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वित होतील अशी माहिती देण्यात आली आहे. असे सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी सांगितले.
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी चार लिफ्ट बसविले जाणार आहेत. याच्या कामालादेखील सुरुवात झाली आहे. मार्च २०२५ पर्यंत या चारही लिफ्ट कार्यान्वित होतील, असे रेल्वे प्रशासनाने उद्दिष्ट आहे.
प्रवाशांच्या मागणीचा जोर
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकावर लिफ्ट बसविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र, या कामात होणार्या दिरंगाईमुळे रेल्वे प्रवासी नाराज झाले होते. प्रशासनाने दिरंगाई न करता येथील लिफ्ट बसविण्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पण आता लिफ्टमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्राथमिक स्तरावर काम सुरू
पुणे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना आहे. तसेच १२ मीटर रुंदीच्या पुलाला रॅम्पनेदेखील जोडले आहे. त्यामुळे प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाणे सोपे झाले आहे. मात्र लिफ्ट नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. काही सदस्यांनी याची वारंवार मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने चार लिफ्ट बसविण्याचा निर्णय घेतला. सध्या याचे प्राथमिक स्तरावर काम सुरू आहे. चार फलाटांवर चार लिफ्ट बसविले जाणार आहेत.