प्यार का राग सुनो रे… हूं ऊ ऊ

सा ल १९६२…
देव आनंदने एक चित्रपट काढायचं ठरवलं. चित्रपट दिग्दर्शनाची जबाबदारी देव आनंदने त्याचा भाऊ विजय आनंदला दिली व संगीताची जबाबदारी एस.डी.बर्मनला म्हणजेच सचिन देव बर्मनला दिली.

या चित्रपटात अनेक सुमधुर गीते होती, जी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अतिशय लोकप्रिय झाली. त्यापैकी एका गीताला सचिनदा चाल लावत होते. चाल लावून झाली… संगीत नियोजन झाले. सचिनदांच्या सगळ्याच असिस्टंटला त्या गीताची चाल व संगीत खूप आवडले…पण सचिनदा समाधानी नव्हते.

“पता नही क्या लेकिन अभी कुछ रहा गया है…” असं ते वारंवार सांगायला लागले. सगळे बुचकळ्यात पडले. बर्मनदांनी चाल तर कर्णमधुर लावली होती…संगीतही खूपच मधुर होते मग काय राहिले ? कोणालाही कळत नव्हतं, पण काहीतरी राहिलयं ही जाणीव सचिनदांच्या मनातून जात नव्हती. सचिनदा अतिशय कडक शिस्तीचे संगीतकार होते. जोपर्यंत त्यांच्या मनासारखी रचना होत नसे तोपर्यंत ते शांत बसत नव्हते.

नवरीला कितीही सजवा, पण नवरीच्या कपाळी सुंदर टिकली नसेल तर नवरीचा शृंगार शोभा देत नाही, अगदी तसंच या गीताला टिकली लावायची बाकी राहिली आहे ही जाणीव सचिनदांला होत होती. काय राहिलंय बरं…? सचिनदा अतिशय बेचैन झाले. त्यांनी सगळ्या असिस्टंटना सुटी दिली व विचार करत बसले.

त्या गीताच्या ओळी ते मनातल्या मनात वारंवार गाऊ लागले…अचानक एका ओळीनंतर त्यांच्या तोंडून नकळत निघालं…हूं ऊ ऊss. सचिनदांनी उत्साहाने आरोळी ठोकली व प्रचंड आनंदाने भिंंतीवर जोराने थाप दिली…अरे हीच ती टिकली जी या गीताला लावायची राहिली होती. गीताच्या त्या विशिष्ट ओळीनंतर “हूं ऊ ऊss” लावत ते गीत सचिनदांनी अनेक वेळा मनातल्या मनात गायलं.

सचिनदाचं समाधान झालं होतं…आता माझ्या रचनेला पूर्णता आली या जाणीवेनं त्यांचं मन अतिशय आनंदित झालं. ते गाणं पूर्ण झाल्याची बातमी सचिनदांनी त्यांच्या मुख्य असिस्टंटला फोन करून दिली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. नंतरच्या दिवशी सचिनदांनी “हूं ऊ ऊ” ला सुरात बसवून ते गाणं आपल्या टीमला ऐकवलं अन संपूर्ण टीमने त्याला दाद दिली. सचिनदा हाडाचे कलावंत होते. गीताचा मूळ भाव समजून त्या गीताला न्याय देण्यासाठी ते प्रचंड मेहनत करायचे.

त्या दिवशीही गाण्याला पूर्णता देण्यासाठी सचिनदांची तडफड पाहून संपूर्ण टीम भारावून गेली. झालं…गाण्याची रेकॉडिर्ंंगची तारीख जवळ आली. सचिनदांनी गीताचा गायक मोहम्मद रफीला बोलावून कसून सराव घेतला व “हूं ऊ ऊsss” विषयी विशेष सूचना दिली. मोहम्मद रफी हा दैवी प्रतिभा असलेला महान गायक. सचिनदाला नेमकं काय हवं ते रफीसाहेबांनी अचूक ताडलं.

१९६३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याचं नाव होतं “तेरे घर के सामने” व या चित्रपटातील “हूं ऊ ऊ” वालं गीत होतं…”दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो…” चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाच्या गीतांनी त्यातही या गीताने व त्यातही या “हूं ऊ ऊ” ने अक्षरशः धमाल उडवून दिली होती.

Prakash Harale: