साहित्यिकांचा मेळावा सजणार

रसिकांनी वक्त्यांची मते नोंदवून घ्यावीत आणि समोरासमोर चर्चा करावी. अशा कार्यशाळा अधिक फलदायी ठरू शकतात, असं माझं मत आहे. परिसंवादाचं शतप्रतिशत स्वरुप आता बदलायला हवं. याखेरीज अनेक नवे चेहरे उत्तम दर्जाची साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांचा शोध घेणं आणि त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रण देऊन सारस्वतांच्या या मांदियाळीत सामावून घेणं हेदेखील साहित्य संमेलनांपुढील असायला हवं.

उदगीर इथे पार पडणार्‍या ९५ व्या साहित्य संमेलनाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून कार्यक्रमपत्रिकाही जाहीर झाली आहे. एका वर्षात आयोजित केलं जाणारं हे दुसरं साहित्य संमेलन असल्यामुळे हादेखील एक चर्चेचा तसंच औत्सुक्याचा विषय आहे. कोरोनामुळे लादलेले निर्बंध दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असताना पार पडणारं हे संमेलन साहित्यिकांबरोबरच रसिकांसाठीही संस्मरणीय ठरेल, अशी आशा वाटते. एका वर्षात दोन साहित्य संमेलनं का घेतली जात आहेत, हा सर्वसामान्य पडलेला प्रश्न आहे. अनेकांनी तो बोलून दाखवला. आता निवड समितीमध्ये नसल्यामुळे मी याविषयी काहीही भाष्य करू शकत नाही. मात्र साहित्य संमेलनांमुळे समाजात चांगले प्रवाह निर्माण होतात हे मात्र माझं ठाम मत आहे. खरं तर सहित्य संमेलन हा साहित्यप्रेमींचा ऊरुस असतो. त्यानिमित्ताने केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे, तर देशभरातले साहित्यिक आणि साहित्यप्रेमी एकत्र येतात. यानिमित्ताने त्यांना एक व्यासपीठ मिळतं. नवोदित कवींना आपल्या कविता सादर करण्यासाठी एक हक्काची जागा मिळते. इथे त्यांना आपल्या कविता सादर करता येतात. निरनिराळ्या विषयांवरचे परिसंवाद घेऊन त्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं जातं. एकूणच इथे होणारं साहित्याविषयीचं विचारमंथन आणि सादरीकरण ही अशा संमेलनांची सकारात्मक बाजू असते.

असं असलं तरी साहित्याचा हा सोहळा आणि तिथला राजकारण्यांचा वावर हा सदोदित चर्चेत राहणारा विषय आहे. दरवर्षी हा एक वादग्रस्त विषय चर्चेत असतोच. दुर्गाताई भागवत यांनी याविषयीची आपली प्रखर आणि परखड मतं व्यक्त केली होती. साहित्याचा मेळावा हा साहित्यिकांचाच असावा आणि तिथे मानाचं पान साहित्यिकांनाच असावं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र आता निरनिराळ्या कारणांसाठी अनेक राजकारण्यांना साहित्य संमेलनासाठी आमंत्रण दिलं जातं. खरं तर साहित्यिक अथवा साहित्यप्रेमी म्हणून राजकारणी इथे येऊ शकतात. त्यांना आडकाठी असण्याचं कारण नाही, पण मानाची जागा साहित्यिकांचीच असावी, असं माझंही स्पष्ट मत आहे.

लक्षात घेण्याजोगी आणखी एक बाब म्हणजे सध्याची संमेलनं अत्यंत खर्चिक झाली आहेत. या खर्चाचा मेळ बसवण्यासाठी आयोजकांपुढे वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांना विनंती करण्याखेरीज पर्याय राहत नाही. प्रायोजक मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते. प्रायोजक चांगले असले तर त्यालाही हरकत नाही. त्यांनी स्वखुशीनं मदत केली तर ती जरुर स्वीकारायला हवी. पण केवळ दान किंवा मदत मिळावी, म्हणून त्यांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून झुकतं माप देणं अयोग्य आहे. हे प्रशस्त दिसत नाही. थोडक्यात, साहित्यिकांनी आपला स्वाभिमान जपणं अत्यंत गरजेचं आहे, असं मला वाटतं.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे सध्याची साहित्य संमेलनं खर्चिक होण्यामागेही बरीच कारणं आहेत. त्याचा एक भाग म्हणजे आता साहित्यप्रेमींची गर्दी वाढू लागली आहे. गर्दी वाढली की साहजिकच मंडप घालावा लागतो. बसण्याची व्यवस्था करावी लागते. निमंत्रितांच्या भोजनाची, निवासाची सोय करावी लागते. पूर्वी गर्दी मर्यादित असल्यामुळे हा खर्च कमी होता. मुख्य म्हणजे राजकीय व्यक्तींचा जास्त संचार नसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा वावरही कमी होता.

आता बघायला गेल्यास सारस्वतांच्या या मेळाव्यात राजकीय व्यक्तींच्या चाहत्यांची संख्याही नोंद घेण्याजोगी दिसून येते. खरं सांगायचं तर हा गर्दीचा फुगवटा असतो. उदाहरणार्थ, अहमदनगरला झालेल्या संमेलनात स्थानिक, राजकीय व्यक्तींच्या चाहत्यांची संख्या प्रचंड होती. ते मोठ्या प्रमाणात मंडपात हजर होते. पण स्वागताध्यक्षांचं भाषण झालं आणि ते सगळे उठून उभे राहिले. साहित्याच्या दरबारात असं दृश्य बघायला मिळणं योग्य नाही. मात्र ही आजची शोकांतिका आहे.

गर्दी असते तेव्हा दर्दी कमी असतात, हे सत्य आहे. हे सत्य सध्याच्या साहित्य संमेलनांमध्ये वारंवार बघायला मिळतं.
खेदाची आणखी एक बाब म्हणजे बरेचसे नामांकित साहित्यिक आता साहित्य संमेलनाला हजेरी लावत नाहीत. परिसंवादामध्ये अथवा काव्यवाचनामध्ये संधी दिली तरच ते येतात. अन्यथा ते फिरकत नाहीत. दुसरी बाब म्हणजे सादरीकरणाबद्दल कवी आणि लेखकांना मानधनाची अपेक्षा असते. ते योग्यही आहे. पण ही अपेक्षा नेमकी किती रकमेची असावी, हादेखील एक विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. अर्थात असेही काही साहित्यिक आहेत, जे मानधन आदरपूर्वक नाकारतात. दिला जाणारा प्रवासखर्च नाकारणारेही काही साहित्यिक आहेत.
मात्र ही संख्या नगण्य असल्यामुळे साहित्य संमेलनाचा खर्च वाढत जातो. खेरीज इथली भोजनव्यवस्था उत्तमातली उत्तम ठेवण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. पुण्याच्या साहित्य संमेलनामध्ये चितळेबंधूंनी प्रायोजक म्हणून बराच भार उचलला होता. पण असे प्रायोजक सतत मिळतात असं नाही. मागे एकदा गुटख्याचा व्यवसाय करणार्‍या एका व्यापार्‍याला साहित्य संमेलनाचा प्रायोजक म्हणून मान्यता दिली होती. अर्थात, अभय बंग आणि त्यांच्यासारख्या काहींनी तीव्र निषेध नोंदवून हा बेत हाणून पाडला ही बाब वेगळी, पण मुळात यासाठी आवाज का उठवावा लागतो हा माझा प्रश्न आहे. खरं पाहता ही खबरदारी आधीपासून घेतली गेली पाहिजे.
या सगळ्या पार्श्वभूमीवरील एक चांगली बाब, ही की या संमेलनांमुळे आता साहित्यप्रेमींची संख्या वाढू लागली आहे. त्यांची पावलं मंडपाकडे वळू लागली आहेत. मात्र हा सगळा बदल केवळ साहित्य संमेलनांकडूनच अपेक्षित धरणं योग्य नाही. कारण इथे मोजके लोक असतात. पुलंचे शब्द उधार घेऊन सांगायचं तर, हा दीड दिवसाचा गणपतीच असतो. विसर्जन झाला की तो विषय संपतो. पण म्हणून संमेलनं भरवणं थांबवणं अथवा त्याला कमी लेखणं योग्य नाही. आता तर साहित्य संमेलनाच्या शताब्दीकडे आपली नजर लागली आहे. यंदाचे नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे हे अध्यक्षपदासाठी योग्य नाव आहे. ते नावाजलेले साहित्यिक आहेत. पुढचं एक वर्ष त्यांच्याकडून काम होणं अपेक्षित आहे. मात्र माझ्या मते, केवळ संमेलनाध्यक्षाकडूनच अपेक्षा धरणं चुकीचं आहे. त्यांच्याकडे अवघ्या एक वर्षाचा काळ असतो. या मर्यादित काळात सगळीकडे फिरणं शक्य नसतं. साहित्यिक विचार सर्वदूर पसरवणं शक्य नसतं, म्हणूनच गावागावात, शहरा-शहरात असे प्रयत्न होणं गरजेचं आहे.
स्थानिक साहित्य संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळणं हा एक सन्मान असतो, याबाबत दुमत नाही. म्हणून केवळ त्यांनीच खूप फिरावं. चर्चासत्रं घ्यावीत, अभ्याससत्रं घ्यावीत, अशी अपेक्षा करणं अयोग्य आहे. अध्यक्षानं आपलं भाषण उत्तम पद्धतीने तयार करून सादर करावं आणि मराठी विचार पुढे न्यावा, ही अपेक्षा मात्र नक्की ठेवावी. आजपर्यंत अनेक नामांकित संमेलनांध्यक्षांनी मराठी विचारधारा पुढे नेऊन महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य परंपरेत मोलाची भर घातली आहे. श्री. सासणे प्रवाह पुढे नेतील, अशी अपेक्षा आहे.
यंदाचं साहित्य संमेलन ऐनउन्हाळ्यात उदगीर इथे होत आहे. वातावरणाच्या दृष्टीनं हा भाग कमालीचा उष्मा असणारा म्हणून ओळखला जातो. त्यातच आता उष्णतेची लाट असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. खरं पाहता याचा अंदाज आयोजकांनी घ्यायला हवा होता. इतक्या घाईघाईने हे संमेलन आयोजिण्यामागील प्रयोजन काय, हादेखील विचारला जावा, असा प्रश्न आहे. कारण साहित्यिकांबरोबरच साहित्यप्रेमींनाही या उष्ण वातावरणाचा त्रास होऊ शकतो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी या संमेलनाला उपस्थित राहू शकणार नाही.
संमेलनाध्यक्ष असतानाही मी पाठीच्या दुखण्याने आजारी होतो. तरीदेखील मी उद्घाटनाच्या भाषणाला हजर राहिलो होतो. वेदना असतानाही तिथे हजर राहण्याबाबत मी आग्रही होतो. कारण मी रसिकांचा सन्मान करतो. लोक तिथे प्रेमानं येतात. त्यांचा विरस होता कामा नये, असं मला वाटतं. म्हणूनच यंदाची माझी अनुपस्थिती अधिक त्रासदायक वाटत आहे. साहित्य संमेलनात परिसंवाद आयोजित होतात. इथे एक सूचना करावीशी वाटते की, ते एखाद्या कार्यशाळेसारखे झाले तर अधिक परिणामकारक होतील. रसिकांनी वक्त्याची मतं नोंदवून घ्यावीत आणि त्यावर समोरासमोर चर्चा करावी. अशा कार्यशाळा अधिक फलदायी ठरू शकतात असं माझं मत आहे. वक्त्यानं बोलावं आणि बाकीच्यांनी फक्त श्रवणभक्ती करावी, हे परिसंवादाचं स्वरुप आता बदलायला हवं. खेरीज सध्या अनेक नवे चेहरे उत्तम दर्जाची साहित्यनिर्मिती करताना दिसत आहेत. त्यांचा शोध घेणं आणि त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रण देऊन सारस्वतांच्या या मांदियाळीत सामावून घेण्याचं उद्दिष्टदेखील समोर ठेवायला हवं.
(शब्दांकन : स्वाती पेशवे)

फादर फ्रान्सिस दिब्रिटो
माजी अ. भा. म. सा. संमेलनाध्यक्ष


Sumitra nalawade: