मी व माझी साडेतीन वर्षाची मुलगी तिची खेळणी खेळत होतो पण थोडा वेळ झाला आणि तिने सांगून टाकलं की, ‘आई, ह्या खेळण्यांबरोबर मी खूप वेळा खेळले आहे आता नकोत मला ही खेळणी’. खरंच तुमच्याकडे पण असेच काहीसे संवाद असतील ना? मग मी यावर उपाय म्हणून कॅालेजमध्ये जे शिकले तसेच आत्ता आनंदक्षणमध्ये काम करत आहे तिथे जे शिकले त्याप्रमाणे ही खेळणी घेऊन त्यासंबंधी काही वेगळ्याप्रकारे खेळ ठरवू शकतो का तसेच काही वेगळ्या उपक्रमांचे नियोजन करू शकतो का याचा विचार करत होते आणि एकदम लक्षात आले की शाळेमध्ये प्रकल्प पद्धतीने काम घेतले जाते.
प्रकल्प हा शब्द ऐकला की बऱ्याच वेळा पालकांना वाटत काहीतरी उपक्रम दिला आहे. तो पूर्ण करून द्यायचा पण खरंतर प्रकल्प म्हणजे एक विषय घेऊन त्याचे सर्व बाजूने ज्ञान होण्यासाठी व तो समजण्यासाठी केलेला अभ्यास. आनंदक्षण मध्ये प्रकल्प पद्धत आपण बालवाडीपासून सुरु करतो. यामध्ये एक विषय घेऊन त्या विषयाची संपूर्ण माहिती होण्यासाठी आपण भाषा, गणित, तार्किक, व्यक्तीअंतर्गत, आंतरव्यक्ती, जीवनव्यवहार, कला, शारीरिक कृती यासारख्या विषयांच्या आधारे उपक्रमांचे नियोजन करतो.
तसेच प्रकल्प घेण्याचे मुख्य उद्देश म्हणजे विषय वेगवेगळे असल्याने भरपूर शब्दसंपत्ती वाढते, उत्सुकता वाढते, प्रश्न पडायला सुरुवात होते, गटातील कामामधील सहभाग वाढतो, विचारांना चालना मिळते, धीटपणा वाढतो यासारखे एक ना अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतात.
सुरुवातीला मुलाला किंवा मुलीला त्या विषयाशी संबंधित काय महिती आहे ते जाणून घेतले जाते व त्यानुसार नियोजन केले जाते. उपक्रम हे थोडे गप्पांमधून, प्रत्यक्ष बघून, कृतींतून, अनुभव घेऊन, चित्रांतून, गोष्टींतून, गाण्यातून, खेळांमधून मूल शिकते असे वेगवेगळ्या माध्यमांतून असल्यामुळे आनंदाने शिकते, त्यात रस घेते. ‘अजून काय करायचं आहे’ यासाठी उत्सुक असते.
आपण आता ‘झाड’ हा प्रकल्पाविषयी थोडंसं बघूया. झाड हा प्रकल्प घेतला तर सुरुवातीला मुलाला त्यासंबंधी काय काय माहिती आहे ते जाणून घ्यायचे. त्यानंतर मुलाचे वय लक्षात घेऊन व त्यानुसार काय काय माहिती करून देऊ शकतो. यासाठी विषयानुसार आपण माइंड मॅप बनवतो.
त्यानंतर आजूबाजूला कोणकोणती झाडे आहेत, त्यासाठी चालत फेरफटका मारणे, बघून आल्यावर त्यासंबंधी गप्पा मारणे, चित्र काढणे तसेच नवीन वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे, बी ते झाड जीवनक्रम समजणे, बाटलीत एक लहान झाड ठेवून त्यातून झाडाच्या अवयवांची माहिती करून घेणे, चित्र काढणे. त्या अवयवांचा आपल्याला होणारा उपयोग जसे नारळाचे झाड म्हटले की नारळ, करवंटी, त्याच्या झावळा इ. सर्व अवयवांचे उपयोग करवंटीपासून वाद्य बनवणे, तराजू बनवणे.
तसेच झाडाचे कोणकोणते अवयव म्हणजे आपल्या जेवणात त्याचा वापर केला जातो, पान म्हटलं पालेभाज्या, मूळं म्हटली की बटाटा, रताळं; खोड म्हटलं, की दालचिनी. वास चव यांची ओळख. झाडाच्या अवयवाचा वापर करून मोजणी- कमी जास्त/ उंच बुटका/लांब आखूड यांसारख्या तुलना, कलेमध्ये रंगकाम, चिकटकाम, कोलाज काम, क्राफ्ट- पानांची पर्स बनवणे इ. झाड नसती तर, झाड आणि माणूस यातील फरक, झाड माणूस दोघांमधील संवाद, झाड लावल्यानंतर जसे पालेभाज्या फळभाज्या मुलांनी त्या काढणे- स्वच्छ धुणे- त्यापासून पदार्थ बनवणे व खाणे.
प्रकल्पामधील अजून एक उपक्रम म्हणजे आलेख. खरं तर आपण बालवाडीतील मुलांना आपण हे चित्र आहे असं सांगतो म्हणजे आजूबाजूला फेरफटका मारून आल्यावर मुलांना विचारतो फुलांची किती झाड होती, भाज्यांची किती झाडं होती, फळांची किती झाडं होती, हे विचारून झाल्यावर १ झाड म्हणजे १ चौकोन रंगवायचा अशा प्रकारे ते पाहिलेल्या गोष्टींच चित्र काढतात व रंगवतात (ह्यालाच आलेख म्हणतात हे नाव त्यांना मोठ्या वर्गात गेल्यावर कळेलच की ) त्यावरून प्रश्नांची उत्तरे देतात जसे सगळ्यात जास्त झाडे कशाची होती?वगैरे, पण ह्यामध्ये मुले आनंदाने सहभागी होतात.
बालवाडीच्या वयातील मुले घरीसुद्धा त्यांना काही तरी करायचे म्हणून मागे लागतात जसे सतत काही तरी दे ना, मी तुला मदत करू का? किंवा काम करताना सतत प्रश्न विचारत असतात त्या वेळी त्यांना ज्ञान वाढवणारे, विचारांना चालना देणारे, आनंद देणारे, उत्सुकता वाढवणारे उपक्रम देऊ शकतो. बालवाडीच्या वयातील मुलाचे शिक्षण हे खरतर सगळ्यात जास्त कुठे होत असेल, तर ते स्वयंपाकघर. इतक्या गोष्टी, खेळ, उपक्रम मूल तिथं अनुभवतच असते.
जसं की गप्पा मारताना स्वयंपाकघरात काय काय दिसत आहे? हे डबे इथंच का ठेवले असतील ? (तार्किक), घरातील वस्तूंमधून मोजणी, तुलना (कमी-जास्त, जड-हलका इ.) तसेच जेवढी माणसं आहेत तेवढी ताट घे, वाट्या घे, पाणी प्यायची भांडी घे, वाट्या पुरल्या का? तर २ वाट्या कमी आहेत(गणिती). स्वयंपाकामधील पदार्थ उरले तर आमटी कोणत्या पातेल्यात मावेल? भात कोणत्या बाऊलमध्ये काढून ठेवू शकतो? घरात किराणा माल आणला तर ही डाळ कोणत्या बरणीत मावेल, धने जिरे सारख्या कमी जिन्नस कोणत्या बरणीत मावेल?, यातून अंदाजक्षमता वाढते तसेच विकसित होते. डाळ- तांदूळ निवडणे व बरणीत भरणे, गहू निवडणे यातून हस्त-नेत्र समन्वय- सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो, एकाग्रता वाढते.
याबरोबरच पोळी लाटणे, भाजी करताना फोडणीमध्ये आई काय काय घालते (निरीक्षणक्षमता) मीठ जास्त टाकलं तर कशी चव लागेल? सरबत करताना चुकून जास्त लिंबू झालं तर कशी चव लागेल? यासारखी चवींची ओळख, सरबत करताना यात विरघळेल (छोटे छोटे विज्ञान खेळ ) कधीतरी भांडी पुसायला व लावायला देणे यातून वर्गीकरण ताट एकत्र, वाट्यांच्या ट्रॅालीमध्ये वाट्या लावणे, चमचे एकत्र करणे इ. पातेली सर्व एकात एक घालून ठेवणे यातून क्रमवारीची ओळख जसे लहान पातेल्यापासून मोठ्या पातेल्यापर्यंत (चढता उतरता क्रमाची सुरुवात इथूनच होते) यांसारखे अजून असंख्य गोष्टी मूल करत असते असेच मुलाचे वय लक्षात घेऊन असे उपक्रम आपण सतत मुलाबरोबर खेळलो तर ते स्वतःहून निरीक्षण करायला लागते.
या आणि यासारख्या अनेक कृतींतून मुलाचे शिक्षण होत असते हे जर आपण लक्षात घेतले तर इकडे हात लावू नको, हे करू नको, लुडबुड करू नको हे मुलाला म्हणण्याचे प्रमाण होईल व अजून यातून काय व कसं देऊ शकतो या विचाराला सुरुवात होईल व मूलही आनंदी होईल.
आपण यांसारखे नवीन उपक्रम, कृतींचे नियोजन केले आणि मुलाबरोबर खेळलो तर मुलालासुद्धा अभ्यास वाटत नाही व आनंदाने सहभागी होईल, आवड निर्माण होईल. घरातील सर्वजण मुलाबरोबर खेळले तर पूर्णपणे तो मुलाचा वेळ असेल व तो खूश होईल.
यासारखे खेळ खेळत असताना जर घरात एखादा कोपरा या खेळांसाठी, उपक्रमांसाठी केला.
त्यात बनवलेल्या वस्तू ठेवल्या, त्यासंबंधीची कात्रणे लावली, मुलांची चित्र लावली, फोटो, प्रत्यक्ष वस्तू ठेवल्या तर ह्या गोष्टी सतत मुलाच्या डोळ्यांसमोर राहतात व त्याचे ज्ञान दृढ होते. तसेच पुढे जाऊन ‘अभ्यासाची जागा’ या संकल्पनेची सुरुवात असू शकते. वेळ मुलाबरोबर बसून ठरवली तर त्या वेळेत उपक्रम करायला मूल नाही म्हणणार नाही, एका जागी बसून, ठरलेल्या वेळेत खेळ खेळण्याची आवड निर्माण होईल.
अजून एक उपक्रम म्हणजे प्रत्यक्ष अनुभव ज्याला आम्ही क्षेत्रभेट म्हणतो. यामुळे मुलाला कुठे घेऊन जायचं, काय काय दाखवायचं यांची यादी तयारी केली जाते ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाता येते व महिती होते. खरं तर प्रकल्प किती वेगळा आणि महत्त्वपूर्ण उपक्रम आहे याचा अनुभव आपण सगळे मिळून घेऊया.