लोकराजा

अॅड. महेश भोसले

लोकराजा हा शब्द उच्चारला तरीही आपल्या डोळ्यासमोर येणारे नाव म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शिवशाही नंतर राज्यातील थेट शेवटच्या माणसाला आपला वाटणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. शाहुराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे झाला आणि त्यांचा मृत्यू दि. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे झाला. जेमतेम आठ्ठेचाळीस वर्षाचे आयुष्य. पण आयुष्याचा कार्यकाळ जरी लहान असला तरीही एक राजा म्हणून त्यांचे कर्तुत्व हजारो वर्ष कमी पडतील इतके मोठे आहे. २ एप्रिल १८९४ रोजी शाहूराजे वयाने सज्ञान झाले आणि कौन्सिल ऑफ अडमीनिस्ट्रेशन यांचे कडे असलेले कारभाराची सूत्रे शाहू राजांकडे आली.

स्तविक वयाने लहान असले तरीही त्यांची विचारसरणी हि अधुंक तर होतीच पण तत्कालीन काळाच्या खूप पुढची देखील होती हे सिद्ध होते ते ज्या दिवशी त्यांनी राज्यकारभार हाती घेतला त्या दिवशीच जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातून. जाहीरनाम्यात ते म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थानाची हरएक प्रकारे सदोदित भरभराट व्हावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहानथोर जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदिकरून तमाम प्रजाजन शुद्ध अंत:करणापासून मोठ्या राजनिष्ठेणे आम्हास सहाय्य करतील, अशी आमची उमेद आहे. हि आमची काकीर्द दीर्घकालपर्यंत चालउन सफल करावी, असे मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एकभावे प्रार्थना करितो. याच्यातून शाहू राजांची आपल्या कामाची इच्छा आणि प्रजेप्रती असलेली अपेक्षा दोन्हीही गोष्टी प्राक्त होतात. इथे शाहू राजे ईश्वरास प्रार्थना करताना दिसतात. राजे देव आणि धर्मास विरोध करणारे नव्हते परंतु धर्माती वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था त्यांना मान्य नव्हती. अशी व्यवस्था केवळ अमान्य करून ते थांबले नाहीत ते त्यांनी त्या व्यवस्थेवर प्रकर्षाने हल्ला चढवला.


आज कोल्हापूर कुस्तीसाठी आणि तालमीसाठी प्रसिद्ध आहे त्यामागे शाहू राजांचे योगदान खूप मोठे आहे. रुस्तुम-ए-हिंद च्या तोडीचे मल्ल तयार करण्यास राजांनी पुढाकार घेतला. मल्लांच्या उदरनिर्वाहाची सोय करण्यापासून ते त्यांना तयार करणे, खुराकाची तरतूद करणे, व्यायामावर देखरेख करणे, वैध्यकीय सुविधा देणे, बाहेरील मल्ल आणून त्यांची लढत घडउन आणणे आणि त्यांचा मानसन्मान करणे हे शाहू राजांनी सुरु केले. आज जगभरात कोल्हापूरचे कुस्तीसाठी जे नाव निघते त्याचा पाया इथे रोवला गेला आहे. त्याकाळी कोल्हापुरात जवळपास शंभर तालमी होत्या ही लहान गोष्ट नाही. कोल्हापूरला जसे तालमीचे शहर म्हणून ओळखले जाते तसेच त्यावेळी कोल्हापूरला वसतिगृहाचे शहर म्हणून देखील ओळख निर्माण झाली होती. १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथील वसतिगृहाची कोनशीला बसवताना शाहू राजेनी केलेले वक्तव्य खूप महत्वाचे आहे. ते म्हणतात, ब्रिटीश पार्लमेंटला ‘मदर ऑफ पार्लमेंट’ म्हणतात त्याप्रमाणे कोल्हापूरला ‘मदर ऑफ बोर्डिंग हाउसेस’ म्हणजे ‘विद्यार्थी वसतिगृहाची माता’ म्हणले जाते. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, मुस्लीम बोर्डिंग, मिस क्लार्क होस्टेल, दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग, श्रीनामदेव बोर्डिंग, पांचाल ब्राम्हण वसतिगृह, श्रीमती सरस्वतीबाई गौड सरस्वत ब्राम्हण वसतिगृह, इंडिअन ख्रिस्चन होस्टेल, रावबहादूर सबनीस वसतिगृह, आर्यसमाज गुरुकुल, वैश्य बोर्डिंग, ढोर-चांभार बोर्डिंग असे वसतिगृह त्यावेळी कोल्हापूरला सुरु झाले आणि त्या सर्वाना राजांनी सढळ हाते मदत केली. जातीच्या नवे वसतिगृह सुरु करण्यामागे त्या त्या जातीतील लोकांनी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. कारण जात हे वस्त होते आणि त्याचा फायदा चांगल्या कामास घेता यावा हा हेतू त्यामागे होता.


महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महात्मा जोतीबा फुले नंतर जाती अंताचा लढा शाहू महाराजांनी खूप प्रभावीपणे पुढे नेला. जातीवाद आणि जातीद्वेष या दोन्हीही गोष्टीवर शाहू महाराजांनी कायम प्रहर केला आहे. माणूस हा माणूस असतो आणि त्याला कुठल्याही जातीत विभागून त्याची गुणवत्ता केली जाऊ शकत नाही हे शाहू महाराजांनी कृतीतून दाखऊन दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धीची आणि कर्तुत्वाची जान शाहू महाराजांना होती त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना शक्य ते सर्व सहकार्य केले. दोघांचे ऋणानुबंध किती घट्ट होते हे त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रातून दिसतात. ११ मे १९२० रोजी बाबासाहेबांनी शाहू महाराजांना एक पत्र पाठवले होते. अखिल भारतीय बहिष्कृत समाज ची परिषद नागपुरला भरली होती. त्या परिषदेश आपण यावे म्हणून सांगताना बाबासाहेब लिहितात, नागपूरच्या परिषदेस आपले येणे नाही झाले तर आमचा सर्वनाश अटळ आहे. या आणीबाणीच्या काळात आपला टेकू व आधार मिळणे गरजेचे आहे. आम्ही आपलीच लेकरे आहोत. घरी आजारपण असताना हे पत्र मिळताच शाहू महाराज नागपूर परिषदेला हजर राहिले आणि ५०० रुपये देणगी देखील दिली. हा प्रसंग दोघामधील ऋणानुबंध दाखवतो.


वेठबीगारीस शाहू महाराजांचा सक्त विरोध होता. भारतीय संसदेने १९७६ साली वेठबिगार बंद करण्याचा कायदा केला पण शाहू महाराजांनी १८९४ मध्ये राजसूत्रे हातात घेताच वठ हुकुम काढून वेठबिगार बंद केली. शाहू महाराजांचे कुस्ती, शिक्षण, जातीनिर्मुलन सोबत स्त्री शिक्षण, आरक्षण, कलेची आवड आणि कलेस राजाश्रय, शिकार या सर्व गोष्टीत खूप मोठे योगदान आहे. ८०० शब्दांच्या मर्यादेत या लोकाराजाला शब्दबद्ध करणे हि केवळ अशक्य गोष्ट आहे. शाहू महाराजानी १८९४ रोजी राजसुत्र हातात घेतली आणि शाहू महाराजांचा मृत्यू ६ मी १९२२ रोजी झाला.म्हणजे जेमतेम २८ वर्ष मिळाली. त्या काळी दळणवळणाची अपुरी साधने असताना देखील पूर्ण भारत वर्षात शाहू महाराजांनी अनमोल कार्य करून ठेवले आहे. २०२२ हे शाहू महाराजांचे स्मृती-शताब्दी वर्ष आहे. आपण यावर्षी आपल्या परिचित निदान वीस विध्यार्थ्यांना शाहू महाराज आणि त्यांचे कार्य, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे सोबत जाती अंतासाठी केलेला प्रयत्न आणि सर्व धर्म समभाव याच्यासाठी केलेले कार्य हे समजून सांगण्याचा संकल्प करूया म्हणजे येणारी पिढी कुठल्या अंधश्रध्दा पसरवणार्‍या धर्मगुरूंच्या मागे न लागता आधुनिक भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नास लागेल. मला वाटते शाहू महाराजांना अपेक्षित असलेला देश घडवण्यासाठी आपण निदान एवढे तर नक्कीच करू शकतो.

Sumitra nalawade: