कोल्हापूर | रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारात बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरुन उरला, असे वक्तव्य रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले. गेल्या ७० वर्षांपासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवारांसारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली.
अजून काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
“लोकसभेची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा म्हणजेच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. मतदारसंघात शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ऐकू येतील. शरद पवारांचं वय ८४ आहे म्हणून ते ८४ सभा घेणार अशाही चर्चा सुरु आहे. पण मला सांगा शरद पवारांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत की जनावरांना पाणी पाजायचं आहे. या वयातही आमच्यासारख्यांना ते संधी देत नाहीत.” असं सदाभाऊ खोत म्हणाले. तसंच अजित पवारांबाबत आणि शरद पवारांबाबत त्यांनी एक मिश्किल भाष्य केलं.
सदाभाऊ म्हणाले, म्हातारं लय खडूस…
“मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवारांच्या लक्षात आलं की म्हातारं काही कंबरेची किल्ली काढत नाही, म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करु द्या, आम्ही प्रपंच म्हातारं झाल्यावर करायचा का?” हे म्हणत विकासासाठी अजित पवार महायुतीत आले असंही सदाभाऊ खोत म्हणाले.