राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | Rahul Gandhi – काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. आज (7 ऑगस्ट) राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला. तसंच याबाबत लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना काढण्यात आली. या अधिसूचनेनुसार राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातली खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे.

राहुल गांधींना खासदारकी बहाल करण्यात आल्यानंतर ते आजपासूनच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी झाले आहेत. तसंच खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधी संसदेमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांचं ‘इंडिया’च्या खासदारांनी जल्लोषात स्वागत केलं.

नेमकं प्रकरण काय ?

राहुल गांधींनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचा उल्लेख केला होता. सगळ्याच चोरांचं आडनाव हे मोदी कसं असतं? असं खोचक वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार राहुल गांधींना अगोदर सत्र न्यायालयानं आणि नंतर गुजरात उच्च न्यायालयानं दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Sumitra nalawade: