पुणे ः प्रतिबिंब महाराष्ट्राचं, ग्रामीण विकासाचं! हे ब्रीद घेऊन पुण्यातून राज्यभर कार्यरत ग्रामगौरव सामाजिक संस्था व लांडेवाडी, भोसरी (पुणे) येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्तिक विद्यमाने ‘लोकोत्सव महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय पहिला ग्राममहोत्सव होणार आहे.
महोत्सव ग्रामीण विकासाला व शेतीच्या नवप्रयोगांची व्याप्ती वाढवणारा ठरावा, त्या दृष्टीने संयोजकांनी नियोजन करावे, अशी अपेक्षा कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. एस. एस. मगर यांनी व्यक्त केली. पुुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर मैदानावर येत्या १२ ते १६ मे दरम्यान पाचदिवसीय लोकोत्सव महाराष्ट्राचा हा पहिला राज्यस्तरीय ग्राममहोत्सव होत आहे.
ग्रामगौरव उत्कृष्टता महासन्मान पुरस्कार : ग्राममहोत्सवाचे निमित्त साधून राज्यभरात अभिनव काम केलेल्या, लोकसहभागातून विकास साधलेल्या सरपंचांना, निव्वळ महिलांच्या हाती कारभार असलेल्या ग्रामपंचायती, तसेच प्रेरणादायी व्यक्ती, शैक्षणिक, युवक व क्रीडा, सामाजिक, सहकारी, आध्यात्मिक अशा स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांत कार्यरत संघटना, उद्योग-व्यवसाय समूह, महिला व कृषी बचतगट यांना ग्रामगौरव उत्कृष्टता महासन्मान पुरस्कार देण्यात येईल.