प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट

तर मंडळी, काही दिवसांत या दीक्षाच्या रिक्षामध्ये एका सहप्रवासीची भर पडणार आहे. इतके दिवस दोन वेगवेगळ्या रस्त्यांवरून प्रवास करणारे आम्ही आता आयुष्याची एक नवीन वाट चालू पाहतोय. यानिमित्ताने मला माझी सर्वात आवडती गोष्ट आठवली. नील आणि वॅन यांच्या प्रेमाची गोष्ट.

दीक्षा दिंडे | दिक्षाची रिक्षा |

काही वर्षांपूर्वी मला एका अभ्यासक्रमासाठी कोरियामध्ये जाण्याचा योग आला. हा माझा दुसरा कोरियाचा दौरा होता. मी आधीपासून या देशाच्या तर प्रेमात होतेच, परंतु मला नील आणि वॅन या सुंदर जोडप्यामुळे प्रेमाचा आणखी एक नवा अर्थ शिकता आला.

माझ्यासाठी प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. मला माझ्या आजूबाजूच्या लोकांना प्रेमात पडताना पाहून प्रचंड भारी वाटतं. तुटलेली नाती पुन्हा एकत्रित येताना, एअरपोर्टवर आपल्या प्रियजनांना निरोप देताना, आईने मुलांच्या गालाची पापी घेताना अथवा रस्त्यात हातात हात धरून चालणारे आजी आजोबा पाहताना मला प्रेम हे वेगवेगळ्या रुपात भेटत जातं. हे प्रसंग दरवेळी वेगळीच आशा देतात. माझ्या गतआयुष्यात ‘प्रेम करणं ही चूक आहे’ या भ्रमातूनही मी गेलीय. पण हे चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवल्याने झालं असावं कदाचित. आपण एकवेळ संपूर्ण जगाशी लढा देऊ शकतो, पण ज्यांचा आपल्यासोबत राहण्याचा हेतूच नाही, अशा व्यक्तींशी नाही.

हे प्रेम जसा आनंद देतो, तसंच मला त्याची भीतीदेखील वाटते. आपल्याजवळच्या लोकांना गमावण्याची भीती. मी माझ्या माणसांना गमावलं तर माझं काय अस्तित्व उरतं आणि तो त्रास मला सहन होईल का, या भीतीने मी कित्येक रात्री जागून काढल्या आहेत. या भीतीपोटी मी बऱ्याचदा लोकांपासून दूर पळत होते, कधी कधी त्यांनाही दूर केलंय.
परंतु प्रेमात ताकद आहे दोन लोकांना जोडण्याची. प्रचंड अफाट आणि अद्‌भुत अशी गोष्ट. जसं काही वाईट घटनांनी प्रेमावरचा विश्वास मी गमावला होता, तसाच तो पुन्हा एका नवीन व्यक्तीच्या आयुष्यात येण्याने कमावला. तो व्यक्ती म्हणजे माझा सहचारी, अमोल…

अमोल आयुष्यात येण्याच्याही अगोदर मला वॅन आणि नील भेटले. मी या जोडप्याकडे जेव्हा जेव्हा बघते तेव्हा मला The Shape of Water या चित्रपटातील एक ओळ आठवते, ‘When he looks at me, the way he looks at me. He does not know, what I lack. Or – how – I am incomplete. He sees me, for what I – am, as I am. He’s happy – to see me. Every time. Every day’.

वॅन ही जन्मतः दिव्यांग आहे, तर नील तिच्यावर भरभरून प्रेम करणारा बापमाणूस. तसं पाहिलं, तर आपल्या प्रत्येकात काही ना काही कमी आहे. पण जे नाहीय त्यावर रडत न बसता, वॅनसारखी माणसं आयुष्य साजरं करतात, हे तिच्याकडे पाहून कळतं.
आमच्या सेमिनारच्या पहिल्याच दिवशी आम्ही एकत्र नाष्टा करीत होतो. त्या दोघांना सोबत पाहणं हे माझ्यासाठी अद्‌भुत होतं. नील ज्या प्रकारे तिची काळजी घेत होता ते बघून त्यांच्यासोबत संभाषण सुरू करण्यापासून मी स्वतःला रोखू शकले नाही. मला त्यांची गोष्ट जाणून घ्यायची होती.

मी त्या दोघांना विचारले, तुम्ही कसे भेटलात? लग्न केव्हा केले? त्यावर नील म्हणाले, “आम्ही गेल्या वर्षी भेटलो. ती माझी फेसबुक फ्रेंड होती. एके दिवशी तिने तिचा एक सुंदर फोटो कॅप्शनसह अपलोड केलेला ‘मी एकटी चहा घेत आहे. माझ्याबरोबर कोणाला चहा घ्यायला आवडेल?’ आणि मी लगेचच ‘मला आवडेल’ असं उत्तरलो. त्यावर ती म्हणाली, ‘निश्चितच. तू व्हिएतनामला आलास तर मी तुला चहा प्यायला घेऊन जाईल.’ दोनच आठवड्यांनंतर मी तिला भेटायला व्हिएतनामला गेलो आणि मला खरंच तिथे पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिला आधी वाटलं मी बिझनेस ट्रीपसाठी आलोय, पण तिथे जाण्याचं खरं कारण तिला भेटणं होतं.
त्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला परतलो. माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी.

नीलने आपली नोकरी सोडली, सर्व सामान पॅक केले आणि तीन महिन्यांनंतर व्हिएतनामला परत आला. त्याचे उर्वरित आयुष्य तिच्याबरोबर जगण्यासाठी. कायमचं… पुढच्या ६ महिन्यांत त्यांनी लग्न केलं. तिच्यात असलेली कमतरता त्याला तिच्यावर प्रेम करण्यापासून कधीच रोखू शकली नाही आणि ह्यानेच त्यांच्या प्रेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. म्हणजे बघा ना, सगळ्या गोष्टींची जाणीव असताना, समोरच्याला स्वीकारणं, विश्वास दाखवून सोबत राहणंच तर प्रेम असतं. प्रेमही कधी भेदभाव करणं शिकवत नाही…

आज वॅन हनोईतील व्हिगर ऑफ लाइफ सेंटरची संचालिका आहे. जे दिव्यांगांना व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण देतं. ती एका ग्राफिक डिझाइन कंपनीची मालकदेखील आहे. नील आपला बराच वेळ वॅनसोबत घालवतो, तो तिच्याबरोबर असंख्य प्रकल्पांमध्येही गुंतलेला असतो आणि तिच्या सेंटरवर विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजीही शिकवतो.

प्रेम कधीच अपयशी ठरत नाही, लोक ते व्यक्त करण्यात अपयशी ठरतात. समोरच्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारायला कमी पडतात. प्रेम आपल्याला लिंग, जात, धर्म, व्यंग या सगळ्यांपलीकडे नेऊन सोडतं, प्रेम हे सगळे भेदभाव विसरायला भाग पाडतं आणि एकमेकांना जवळ आणतं.

माझं अमोलवर असणारं प्रेम हेसुद्धा कोणत्याही चौकटीत बांधले गेलेले नाही. आम्ही दोघांनी एकमेकांच्या असण्यावर प्रेम केलं आणि त्यामुळे आम्हालाही नवीन वाट शोधता आली. आपल्या प्रवासात मग्न असताना तुम्हीदेखील आपल्या प्रिय व्यक्तीला आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो, हे सांगायला विसरू नका. भावना व्यक्त करायला कोणतीही वेळ नसते.

— दीक्षा दिंडे, girlonthewingchair@gmail.com

Dnyaneshwar: