रक्तातील साखर कमी होणे; बी ५ जीवनसत्त्वाचा अभाव

रक्तातील साखर कमी होणे, रक्तदाब खाली जाणे आणि अल्सर अशा लक्षणांमध्ये असू शकतो बी ५ जीवनसत्त्वाचा अभाव !

बी ५ जीवनसत्त्व (पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड) : बी जीवनसत्त्व शरीरातील प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात भाग घेते. शरीरातील ग्रंथींना चालना देऊन कॉर्टिसॉल आणि इतर हार्मोन्सची निर्मिती वाढवते. हे जीवनसत्त्व मुख्य करून मानसिक आणि शारीरिक ताणतणाव दूर करते. या जीवनसत्त्वामुळे उत्साह वाढतो. रोगांना ते प्रतिबंध करते आणि आजारपणात तब्येत लवकर सुधारण्यास मदत करते. चेतासंस्थेची वाढ आणि प्रगती यासाठी मदत करते. या जीवनसत्त्वामुळे अकाली येणारे वार्धक्य टाळता येते. क्ष किरणांसारख्या घातक किरणांमुळे होणार्‍या दुष्परिणामांपासून संरक्षण देते.

बी ५ जीवनसत्त्व संधिवातावर अत्यंत गुणकारी आहे, असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. संधिवाताच्या रुग्णांमध्ये रक्तातील बी ५ जीवनसत्त्वाचे प्रमाण निरोगी माणसाच्या तुलनेत कमी असते. काही रुग्णांमध्ये हे रोज १००० मिलीग्राम दिल्याने संधिवाताच्या वेदना थांबतात, असे आढळून आले आहे.

औषधांच्या जोडीला व्हिटॅमिन बी ५ दिल्यास लवकर परिणाम होतो आणि शरीरावर औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत. जिवाणूंशी लढणार्‍या पेशींच्या संख्येत वाढ करते. सूर्यप्रकाशामुळे त्वचा जळली असेल व म्हातारपणातील त्वचारोग असतील तर या व्हिटॅमिन बी ५ च्या गोळ्या/इंजेक्शन दिल्यास आराम पडतो. अकाली केस पिकणे हे टाळण्यासाठी तीन महत्त्वाची जीवनसत्त्वे हवी असतात, यामुळे बर्‍याच जणांचे केस पुन्हा काळे झाले आहेत. परंतु त्यासाठी तिन्ही जीवनसत्व (पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड बी ५,
पॅरा-अमीनोबेंझॉइक अ‍ॅसिड (पीएबीए), इनॉसिटॉल) नियमितपणे घेणे आवश्यक असते. तसेच धान्य, गव्हाचा कोंडा, गव्हाची कणिक, तांबडा तांदूळ, वाटाणा, सोयाबीनपीठ, सोयाबीन, काळा वाटाणा, मसूर, फ्लॉवर, फुलकोबी काजू, सूर्यफूल बिया, शेंगदाणे यामध्ये भरपूर, तर फळांमध्ये अत्यंत कमी असते आणि जवळजवळ सर्वच अन्नपदार्थांत हे असते, परंतु धान्य दळताना या जीवनसत्त्वाचा निम्मा भाग वाया जातो. अंडी, यिस्ट यामध्ये भरपूर प्रमाणात असते.

_जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

Dnyaneshwar: