मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? त्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्या विकासाबाबत मोदींनी फडणवीसांना कानमंत्र दिला आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घ्यायची असते. त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्राबाबत काही चर्चा या भेटीत झाल्या. महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचे राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आहे. या राज्याला गतीशील ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी ते पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रात यावे यासाठी निमंत्रित केले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
याशिवाय फडणवीसांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, पंतप्रधान मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सांगितले की, “महायुतीत कोणताही तिढा नाही, मंत्रीमंडळाचा फार्म्युला ठरलेला आहे. लवकरच याची माहिती मिळेल. माध्यमांनी ज्या बातम्या चालवल्या त्या खऱ्या नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दिल्लीत अजित पवार हे त्यांच्या कामासाठी तर मी माझ्या कामासाठी आलो आहे. त्यामुळे येथे आमची भेट झाली नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे यांचे सध्या दिल्लीत काम नसल्यामुळे ते आले नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.