महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी शुक्रवार, ५ डिसेंबरला पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप नेत्यांनी सोमवारी आझाद मैदानावर या तयारीचा आढावा घेतला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि विधान परिषदेतील भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या तयारीची सोमवारी पाहणी केली. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींची मते निर्णायक ठरली. त्यामुळे त्यांचे विजयातील स्थान अधोरेखित करण्यासाठी लाडक्या बहिणींना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भाजपच्या मुंबईतील आमदारांवर शपथविधी सोहळ्याची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. त्याद़ृष्टीने मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या भव्य सोहळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतली.
भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तसंच प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपशासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण आहे. या निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाना अशा महत्त्वाच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. कोण-कोणत्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
विरोधी पक्षांनाही निमंत्रण
विरोधी पक्षांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवले जाणार आहे. शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाही निमंत्रण पाठविले जाईल, असे सांगण्यात आले.