मुंबई : (Maharashtra Crop Insurance Deadline) राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढता यावा म्हणून, राज्य सरकराने 1 रुपयांत विमा काढण्याची योजना आणली आहे. या आधी 31 जुलै पर्यंत पीक विमा काढण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही शेतकरी यापासून वंचित राहिल्याने तीन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
दरम्यान, आज पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असून, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कारण पुन्हा तुम्हाला चिंतेत पडण्याची गरज भासणार नाही. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवड ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरत आहे.
सरकारच्या निर्णयानंतर कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्तीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतोय. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही होती, ती आता केंद्र शासनाने 03 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहान कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.