निमशहरी भागातील ५०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण
पुणे : पुण्यातील युनिक एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सीएसआर अॅवॉर्ड २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक विजय कुलकर्णी व बाळासाहेब झरेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक नामांकीत कॉर्पोरेट्स, एनजीओ, सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलवर आधारित कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ए.सी. अॅण्ड रेफ्रिजरेशन, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, फॅशन डिझाइनिंग, ब्यूटिशियन इ. क्षेत्रांतील ५० हून अधिक कोर्सेसचा समावेश आहे.
संस्थेमार्फत मागील वर्षी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण आणि निमशहरी भागातील ५०० हून अधिक महिलांना कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्था संचलित युनिक स्कील डेव्हलपमेंट सेंटर मागील अनेक वर्षांपासून समाजातील वंचित घटकातील युवक, युवती व महिलांना नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सरकारी संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, तसेच कॉर्पोरेटस इ. च्या सहकार्याने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) योजनेअंतर्गत गरजूंना विविध तांत्रिक कोर्सेसचे कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे.