बदलत्या वातावरणाचा गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना फटका, रोगांचा प्रादुर्भाव वाढला; भावही घसरले!

हिंगोली : (Maharashtra farmers damage) सध्याच्या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण आहे. तर कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या फुलांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळं निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक फटका बसत आहे.

दुसरीकडं दमट वातावरणामुळं अचानक गुलाबाच्या उत्पादन चार पटीनं वाढ झाली आहे. यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणावर गुलाबाच्या फुलांची आवक सुरु झाली आहे. याचा परिणाम बाजार भावावर होत आहे. सध्या गुलाबाचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट घिरट्या घालत आहे.

दमट वातावरणामुळे अचानक गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वाढले आहे तर दुसरीकडं बाजारात फुलांची आवक वाढल्यानं फुलांचे भाव घसरले आहेत. अशातच ढगाळ वातावरणामुळं तयार असलेल्या गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. गुलाबावर करपा रोगाचा, किड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं गुलाबाच्या पुढील बहरात उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

Prakash Harale: