एकादशीनिमित्त विठुरायाला केलेली द्राक्षांची आरास अर्ध्या तासात गायब, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

पंढरपूर | Pandharpur News – आज (3 मार्च) आमलकी एकादशीनिमित्त (Amalaki Ekadashi) पंढरपूरच्या (Pandharpur) विठुरायाच्या मंदिराला द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तब्बल एक टन द्राक्षांचा वापर करून विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजवण्यात आला होता. मात्र, केवळ अर्ध्या तासात ही द्राक्षांची आरास अचानक गायब झाली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी सहा वाजता द्राक्षांची आकर्षक सजावट केल्यानंतर भाविक दर्शन घेण्यासाठी आले. त्यानंतर अर्ध्या तासातच एक टन द्राक्षांपैकी एकही मणी शिल्लक राहिला नाही. पुण्यातील भाविकांनी आमलकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल एक टन द्राक्षांची सजावट केली होती. त्यानंतर केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्यानं सगळीकडे चर्चेला सुरुवात झाली आहे.

दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षे खाल्ल्याचा दावा केला जात आहे. तसंच या प्रकारानंतर याबाबत चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. ज्या भाविकांनी ही द्राक्ष सजावटीसाठी दिली होती त्यांच्या भावना दुखावल्या असून या प्रकारात नेमकं कोण आहे याचा शोध मंदिर प्रशासनानं तातडीने घेण्याची आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेण्याची मागणी विठ्ठल भक्तांनी केली आहे.

Sumitra nalawade: