नवी दिल्ली | Sanjay Raut – सध्या राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आम्ही जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आणलं असं म्हणत होते. पण हे जर जनतेच्या मनातील सरकार असतं तर जनता रस्त्यावर उतरली नसती, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊतांनी सांगितलं की, सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यांंचा मुलगा भूषण देसाई (Bhushan Desai) यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नसल्याचं सुभाष देसाईंनी सांगितलं आहे. शिंदे गट तर कधी बाप पळवतात तर कधी मुलं पळवतात. त्यांची ही मेगाभरती कुचकामी आहे. यापूर्वी शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी भूषण देसाईंच्या संदर्भात काही आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सामंतांनी केलेल्या आरोपांचं काय झालं? असा सवालही राऊतांनी केला.
शिंदे गटात कोणी प्रवेश केल्यानं शिवसेनेच्या वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही एकदा संघर्षाला उतरल्यावर सगळ्या संकटांना सामोरं जाऊ, असंही संजय राऊत म्हणाले.
पुढे राऊतांनी शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर भाष्य केलं. या व्हिडीओप्रकरणी अनेक जणांना अटक केली जात आहे. यासंदर्भात राऊतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, असं अटक करणं अत्यंत चुकीचं आहे. हा कायद्याचा गैरवापर आहे. तो व्हिडीओ खरा आहे की खोटा याचा आधी शोध घ्यावा. आपल्या महाराष्ट्रात महिलांची बदनामी, शोषण होता कामा नये या मताचे आम्ही आहोत. सर्वांनीच महिलांचा सन्मान केला पाहिजे, असं राऊत म्हणाले.