Maharashtra Shahir : शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधरित असलेल्या‘महाराष्ट्र शाहीर’या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील काही गाणी या आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यापैकीच एक असलेल्या ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यानंतर आता ‘महाराष्ट्र शाहीर’चा दमदार ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि अभिनेता अंकुश चौधरीच्या (Ankush Chaudhari) अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहीर साबळे यांच्या बालपणाची आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणींची झलक दाखवण्यात आली आहे. तसेच ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांची भूमिका साकारलेल्या कलाकारांची देखील झलक बघायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे निर्मिती सावंत हे कलाकार देखील दिसत आहेत.
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.